वृत्तसंस्था / मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने येत्या 6महिन्याच्या कालावधीत आपल्या ई-कॉमर्स ऍपला व्हॉट्सऍपशी जोडणी करण्याची योजना बनवली आहे. रिलायन्स जिओ मार्ट व्हॉट्सऍपशी हातमिळवणी करणार आहे. म्हणजेच व्हॉट्सऍप वर एक असा विभाग असणार आहे ज्याच्या माध्यमातून जिओ मार्टच्या आवश्यक वस्तू ऑर्डर करता येणार आहेत. याच अनुषंगाने ऑर्डरची रक्कम व्हॉट्सऍपवरच भ्राता येण्याची सोय होणार आहे.
याप्रमाणे रिलायन्सचा डिलिव्हरी बॉय आपल्या घराजवळील नोंदणीकृत किराणा दुकानातून आपले साहित्य पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने छोटे दुकानदार, ई-कॉमर्स आणि सुपर मार्केट हे पिछाडीवर राहिले होते. दुकानदारांकडे इतका पैसाही नाही की ते वस्तू विक्री करण्यासाठी मोबाईल ऍप बनवू शकतील. रिलायन्सकडे मात्र तंत्रज्ञान आणि गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. याचाच फायदा रिलायन्स जिओ मार्टला होणार आहे. जियो मार्टवर छोटे दुकानदारसुद्धा इ-कॉमर्सवर आपल्या वस्तु विकू शकणार आहेत. देशभरात अंदाजे 70 लाख दुकाने आहेत. यात औषध व पान दुकानांची भर घातल्यास ही संख्या 1 कोटीवर पोहचते.
जियो मार्टच्या व्हॉट्सऍपवर येण्यानंतर किराणा दुकानांना काही न करता हजारो नवे ग्राहक प्राप्त करता येणार आहेत. ग्राहकांनाही त्यांच्या वस्तु, साहित्य त्वरेने मिळण्याची सोय होणार आहे. ज्याप्रमाणे आपण झोमॅटो, स्वीगीवर जसी ऑर्डर नोंदवतो त्याप्रमाणे व्हॉट्सऍपवर ऑर्डर ग्राहकांना सहजपणे नोंदवता येणार आहे.









