ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. रियाच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, रिया आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज पूर्ण संपणार होती. रियाला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणात रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.