जिल्हा प्रशासन व सेनादलास पुरविले पीपीई किट्स, मास्क व अन्य साहित्य
वृत्तसंस्था/ श्रीनगर
राष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पणातच ठसा उमटवलेल्या रियल काश्मिर फुटबॉल क्लबने आता जम्मू काश्मिर प्रशासन तसेच सैन्यदलास कोरोनाविरुद्धच्या लढय़ात मदत करण्यास सज्ज झाले असून वैद्यकीय कर्मचाऱयांसाठी त्यांनी वैयक्तिक सुरक्षा साहित्य (पीपीई) व मास्क पुरविले आहेत.
संदीप छत्तू हे या क्लबचे मालक असून सोमवारी त्यांनी 150 पीपीई किट्स, 3000 ग्लव्ह्ज आणि 15,000 वैद्यकीय मास्क श्ऱीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. 18 मार्च रोजी जिल्हय़ात कोरोना व्हायरसची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळल्यापासून शाहिद चौधरी या लढय़ात आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकारी टीमने या रोगाच्या निर्मूलनासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरवही यावेळी छत्तू यांनी केला. ‘मला वैयक्तिकपणे डीसी यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्याची इच्छा होती. पण ते जनसेवेत गुंतलेले आहेत. या रोगाची पहिली केस जिल्हय़ात आढळल्यापासून त्यांनी जे काम केलेय, त्याची फार कमी जणांना माहिती आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यापासून केवळ एका किलोमीटरच्या अंतरावर राहतात. पण जनतेच्या सेवेला त्यांनी प्राधान्य देत त्यांना भेटण्याचे त्यांनी टाळले आहे. त्यांच्या कार्याला पूर्ण यश मिळवून देण्याची जबाबदारी आता आमच्यावर असून सरकारने दिलेल्या आदेशांचे पूर्ण पालन करून घरीच राहून त्यांना मदत केली पाहिजे,’ अशा भावना छत्तू यांनी व्यक्त केल्या. हॉटेल सीएच 2 चेही ते मालक आहेत.
आरकेएफसीने सर्व साहित्य जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. प्रशासन जे प्रयत्न करीत आहेत, त्याची अल्पशी परतफेड म्हणून ही देणगी देत असल्याचे छत्तू याप्रसंगी म्हणाले. ‘आम्ही दिलेली ही समुद्रातील एका थेंबासारखी मदत पुरेशी नाही, याची आम्हाला जाणीव आहे. पण अशा कठीणसमयी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरस महासाथीने सर्व जगालाच व्यापले असून त्याविरुद्ध लढणाऱया आरोग्यसेवकांच्या सुरक्षिततेची आम्हाला जास्त चिंता लागून राहिली आहे. या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, व त्यांच्यासमवेत निस्वार्थपणे व जीव धोक्यात घालून सेवा करणाऱया अन्य सेवकांना आम्ही मनापासून सलाम करतो,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
याआधी त्यांनी सेनादलाच्या बीबी कॅन्टोन्मेट येथे 150 पीपीई किट्स, 10,000 मास्क सुपूर्द केल्या. सेनादलाच्या 92 बेस हॉस्पिटल येथे त्याचा वापर केला जाणार आहे. याच हॉस्पिटलमध्ये सेनादलाची ऑफिसर्स, सैनिक, सुरक्षा रक्षक यांच्यावर उपचार केले जातात. वरिष्ठ सेनाधिकाऱयांकडे हे साहित्य प्रदान केले.









