वृत्तसंस्था/ मुंबई
रियल इस्टेट पुन्हा एकदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे क्षेत्र ठरले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसह रिटेल गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात पैसा घातला असल्याचे मागच्या आठवडय़ात दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून निफ्टीतील रियल इस्टेट इंडेक्स 10 वर्षानंतर विक्रमी पातळीवर पोहचू शकला आहे.
या विक्रमात भारतातील 10 रिअल इस्टेट कंपन्यांनी नोंदणीय सहभाग घेतला होता. जवळपास 1 दशकानंतर हे क्षेत्र शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूकीसाठी आकर्षित होताना दिसते आहे. कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात आल्याने अनेकांनी मोठी घरे खरेदी करण्यावर भर दिला होता. कमीत कमी गृहकर्ज व्याजदर, काही राज्यात स्टॅम्प डय़ुटीत सवलत तसेच रहिवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांना लाभणारा प्रतिसाद यातून रिअल इस्टेट कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकीत गुंतवणूकदारांनी रुची दाखवली असल्याचे दिसून आले आहे. 13 जुलैला रियल्टी निर्देशांक इंट्राडेमध्ये सर्वोच्च 386 अंकांवर पोहचला होता. याआधी डिसेंबर 2010 ही सर्वोच्च पातळी निर्देशांकाने गाठली होती.