टीव्हीच्या क्षेत्रात ठेवणार पाऊल
टीव्ही जगतात रियलिटी शोंचे प्रमाण वाढले असून त्यात परीक्षक म्हणून काम करणारे कलाकारही चर्चेत राहत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा आणि किरण खेर दीर्घकाळापासून नृत्याच्या रियलिटी शोंमध्ये परीक्षक म्हणून दिसून येत आहेत. आता या यादीत नीतू कपूर यांचे नाव जोडले जात आहे. चित्रपटांमध्ये उत्तम अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱया नीतू कपूर आता टेलिव्हिजन पदार्पणासाठी पूर्णपणे तयार आहेत.

डान्स रियलिटी शोमध्ये त्या दिसून येणार आहेत. ‘डान्स दीवाने ज्युनियर’च्या परीक्षकाच्या खुर्चीत त्या दिसून येतील. यात 4-14 वयोगटातील मुलेमुली स्वतःच्या नृत्याचे कौशल्य दाखविणार आहेत. मुलांसाठीच्या या रियलिटी शोचा हा पहिला सीझन असणार आहे. नीतू कपूर यांच्यासह या शोमध्ये नोरा फतेही आणि नृत्यदिग्दर्शक मर्जी पेस्तोनजी दिसून येणार आहेत.
या शोचे परीक्षण करण्यासाठी नीतू कपूर अत्यंत उत्साही आहेत. नृत्य करणे मला अत्यंत आवडते. परंतु टीव्हीद्वारे आता घरोघरी पोहोचण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मर्जी आणि नोरा यांनी यापूर्वी काही रियलिटी शोंमध्ये परीक्षक म्हणून काम केले होते. मर्जी हा डान्स इंडिया डान्स, डान्स इंडिया डान्स सुपर मॉम यासारख्या शोंमध्ये दिसून आला होता. तर नोरा डान्स दिवानेची परीक्षक राहिली होती.









