म्हणणे मांडण्यासाठी मागितली भेट
वार्ताहर/ राजापूर
स्थानिक खासदार, आमदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत रिफायनरी प्रकल्पाबाबतचे आपले म्हणणे पोहोचविण्याचा प्रयत्नांना यश येत नसल्याने प्रकल्प परिसरातील शिवसैनिकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे. जनकल्याण प्रतिष्ठान व विलये ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेचे माजी नगरसेवक सुहास तावडे यांनी शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला आहे.
सुरूवातीला विरोधानंतर रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाला त्यानंतर मात्र मोठे समर्थन मिळत आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा याकरीता मागील अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र राज्यात सत्तेच्या चाव्या हातात असलेली शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात असल्याने समर्थकांच्या मागणीला यश येताना दिसत नाही. रिफायनरीला विरोध मावळला असून आता प्रकल्पग्रस्तांसह या परिसरातील शिवसैनिकांनाही रिफायनरी प्रकल्प हवा आहे. येथील शिवसैनिकांनी अनेकदा प्रकल्पाच्या समर्थनार्थ आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचा आवाज पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहचू दिला नसल्याचा आरोप खुद्द शिवसैनिकांतून करण्यात येत आहे.
प्रकल्प समर्थक तसेच शिवसैनिकांनी रिफायनरी प्रकल्पाबाबतचे आपले म्हणणे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची मागणी खासदार व आमदारांकडे अनेकदा केली. खासदारांनी केव्हाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा जाहीर आरोप खुद्द शिवसैनिकांनी अनेकदा केला आहे. लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू देत नसल्याने आता शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी नगसेवक सुहास तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तरूणांना रोजगार व शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देणाऱया प्रकल्पाला जवळपास साडेआठ हजार एकर जमिनीची संमती असून या शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी भेट देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.









