6 ऑगस्टला प्रवेश : काँग्रेसमध्ये खळबळ
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षाला एक नवा धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. काँग्रेसमधील बहूजन समाजाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱया आमदार रवी नाईक यांच्या दोन्ही मुलांना भाजपमध्ये आणण्याची तयारी केली आहे. रितेश नाईक व रॉय नाईक या दोघांना गुरुवार 6 रोजी भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पूत्र विश्वजित राणे यांच्यानंतर आता दुसऱया काँग्रेस नेत्याचे दोन पूत्र भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सध्या काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
निवडणुकीत काँग्रेसला धक्का देणे शक्य होत नसले तरी अशा पद्धतीने काँग्रेस खिळखिळी करण्याचा अलोकशाही पद्धतीचा उपक्रम भाजपने मागील अडीच वर्षे चालविला आहे. रितेश व रॉय नाईक यांना भाजपात आणण्याचे पक्षीय पातळीवरील सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही राजकीय प्रवेशाला मान्यता दिली आहे. मागील काही दिवसांपासून या राजकीय घडामोडी गुपचूपपणे सुरू होत्या. काँग्रेसी नेत्यांना कोणताही थांगपत्ता लागू न देता रवी नाईक यांच्या गुप्त घडामोडी सुरू होत्या. अखेर काल हे बींग बाहेर पडले. भाजपमधील नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
गुरुवारी भाजप प्रवेशाची शक्यता
गुरुवारी 6 रोजी रितेश व रॉय या दोघांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आज 5 रोजी अयोध्येत राममंदिर भूमिपूजन कार्यक्रम होणार असल्याने हा भाजप प्रवेश एक दिवसाने पुढे गेला आहे. रवी नाईक व भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात गुप्त चर्चा सुरू होती. तोडफोडीत तरबेज असलेला एक भाजपमधील प्रमुख नेता रवी नाईक यांच्या संपर्कात होता. ही बोलणी मागील बऱयाच काळापासून सुरू होती, मात्र याचा कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही.
रितेश यांना मिळणार नगराध्यक्षपद
रितेश आणि रॉय नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या बदल्यात अनेक प्रकारचे करार झाल्याची चर्चा आहे. भाजप प्रवेशानंतर रितेश नाईक यांना फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद मिळणार आहे. त्याचबरोबर फोंडा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारीबाबतही चर्चा झाली आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या काही विषयावरूनही बोलणी झाल्याची चर्चा आहे. रितेश आणि रॉय नाईक यांच्या भाजप प्रवेशामागे विविध राजकीय आणि अन्य प्रकरणे कारणीभूत आहेत. सध्या फोंडा परिसरात आणि गोवाभरात पक्ष प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
राणेंनी घातला पायंडा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे काँग्रेसनिष्ठ म्हणून राहिले. वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत असताना त्यांचे पूत्र विश्वजित राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. वडील काँग्रेसमध्ये व पूत्र भाजपमध्ये हे गोव्याच्या राजकारणातील पहिले उदाहरण ठरले. त्यानंतर आता रितेश आणि रॉय नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यास ते दुसरे उदाहरण ठरणार आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर अवघ्या आठ दिवसात विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला होता व आरोग्यमंत्रिपद मिळविले होते. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली व विजयी झाले.
जी राणेंची भूमिका तिच आपली : रवी नाईक
रितेश आणि रॉय नाईक यांच्या भाजप प्रवेशाबाबत रवी नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, विश्वजित राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर वडील प्रतापसिंह राणे यांनी जी भूमिका घेतली तिच भूमिका आपली आहे. आपण काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, पण आपल्या मुलांचे म्हणत असाल तर ते आता लहान राहिले नाहीत. त्यांच्या निर्णयाबाबत तुम्हीच त्यांच्याशी बोला असेही ते म्हणाले. आपण अजूनही काँग्रेस पक्षातच आहे. मुलांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. ते आता मोठे झाले आहेत. ते स्वतः मुलांचे बाप झाले आहेत. त्यांचा निर्णय ते घेतील. विश्वजित राणे भाजपात गेल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी जे सांगितले तेच आपण सांगत आहे, असेही रवी नाईक यांनी सांगितले.









