बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक रितेश देशमुख देखील आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या दिशेने वळला आहे. रितेशने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱया पहिल्या चित्रपटाची सोमवारी घोषणा केली आहे. या चित्रपटात रितेशसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार आहे.
रितेशने चित्रपटातील काही दृश्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. आमचा नवा चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूनम ढिल्लो देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसून येतील. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. खुबसुरत आणि वीरे दी वेडिंग यासारख्या यशस्वी चित्रपटांचे ते दिग्दर्शक होते अशी माहिती रितेशने दिली आहे.

तुमच्या भविष्यातील योजना कोणत्या आहेत? अधिक विचार करू नका, कारण नेटफ्लिक्सवर प्लॅन ए प्लॅन बी येतोय असे तमन्नाने चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले आहे. तमन्ना सातत्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर काम कर आहे. तेलगूमध्ये इलेव्हंथ अवर आणि तमिळमध्ये नोव्हेंबर स्टोरीमधून तिने ओटीटी जगतात पाऊल ठेवले आहे.
प्लॅन ए प्लॅन बी रोमांटिक कॉमेडी चित्रपट असून याची कथा एक मॅचमेकर आणि डिव्होर्स लॉयरच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. रजत अरोरा हे चित्रपटाचे पटकथालेखक आहेत. तर त्रिलोक मल्होत्रा आणि के.आर. हरीश यांनी याची निर्मिती केली आहे.









