उपळे येथील घटना : मुलाच्या आईवडिलांसह चालक गंभीर : अपघातातील कुटुंब राजापूरचे
प्रतिनिधी / वैभववाडी:
वैभववाडी तालुक्यातील उपळे येथील ‘उपळे खिंड’ येथे चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात जवळेथर (ता. राजापूर) येथील धीरज अजय मोरे या सहा वषीय मुलाचा मृत्यू झाला. तर मुलाच्या आई-वडिलांसह रिक्षा चालक गंभीर जखमी असून तिघेही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजापूर तालुक्यातील जवळेथर येथील आरती अजय मोरे (30) या पती अजय मोरे (35) व मुलगा धीरज मोरे (6) यांच्यासह तेथील संतोष शांताराम मोरे (39) यांच्या रिक्षाने आखवणे (ता. वैभववाडी) येथे मंगळवारी सकाळी माहेरी आल्या होत्या. माहेरच्या गणपतीचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण परत आपल्या घरी जवळेथर येथे निघाले होते. आखवणे येथून निघाल्यानंतर हेत-शेवरी फाटा येथे काहीवेळ ते थांबले. त्यानंतर ते जवळेथर येथे जाण्यास निघाले. रिक्षा उपळे घाटी चढून उतारावरून जात असता चालक संतोष मोरे यांचा रिक्षावरील ताबा सुटला व रिक्षा नजीकच्या सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात सहा वर्षीय धीरज हा रिक्षातून बाहेर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती हेत-शेवरी फाटय़ावर टेम्पो घेऊन उभ्या असलेल्या विजय नागप यांना समजली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रिक्षा खोल दरीत असल्याने विजय नागप यांनी सहकाऱयांच्या मदतीने अपघातग्रस्त रिक्षा दोरीच्या सहाय्याने टेम्पोला बांधून दरीतून बाहेर काढली. संपूर्ण रिक्षाचा चक्काचूर झाला होता. नागप यांनी सर्व जखमींना बेशुद्धावस्थेतच स्वतःच्या टेम्पोतून उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तिघांची प्रकृती चिंताजनक
या अपघातात धीरजचा जागीच मृत्यू झाला. अजय मोरे, आरती मोरे व चालक संतोष मोरे हे सर्वजण बेशुद्धावस्थेत होते. ते गंभीर जखमी आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातातील मृत व जखमी हे आखवणे तलाठी कार्यालयातील कोतवाल सुनील पडिलकर यांचे नातेवाईक आहेत.









