माळमारुती पोलिसांची कारवाई : रिक्षा चालकाचा खून केल्याची संशयितांनी दिली कबुली, पुढील तपास सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
रुक्मिणीनगर येथील ऑटोरिक्षा चालकाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता त्या तिघांनी ऑटोरिक्षा चालकाचा खून केल्याची कबुली माळमारुती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे.
इब्राहिम उर्फ गोरडी अमानुल्ला सय्यद (वय 26, रा. महांतेशनगर), महम्मदजायद गुफरान मण्णूरकर (वय 23, रा. उज्ज्वलनगर) आणि उल्यान उर्फ डुर बद्रुद्दीन यरगट्टी (वय 19, रा. सुभाष गल्ली) अशी अटक केलेल्या त्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी रिक्षा चालक नोहान महम्मदनासीर धारवाडकर (वय 23, रा. आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर) याचा खून केला आहे.
गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता नोहान आपल्या घरातून बाहेर पडला होता. सोमवारी गांधीनगर जवळील मुचंडी गॅरेजनजीक असलेल्या एका पडक्मया घरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केवळ चारच दिवसांत त्याचा उलगडा करुन तिघांना अटक केली आहे.
दगडाने ठेचून व तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार यांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन घेतला होता. मार्केटचे एसीपी एस. आर. कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी तपास करुन तिघांना अटक केली आहे.
संशयितांची रवानगी कारागृहात
या प्रकरणी नोहानचा भाऊ अफजल मोहम्मदनासीर धारवाडकर (वय 26) याने दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नोहान याचा खून केल्याचे कबूल केले आहे. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.









