साताऱयातील घटना , शेजारी बसलेल्या महिलेचा प्रताप
प्रतिनिधी/ सातारा
पुण्याहून आल्यानंतर सातारा बसस्थानकावरील रिक्षा स्टॉपवरील रिक्षातून मंगळवार पेठेकडे जात असताना बसस्थानकावर रिक्षा चालकाने एका लहान मुलासह रिक्षात घेतलेल्या एका महिलेने प्रवासादरम्यान एका वृध्दे महिलेच्या पर्समधील 75 हजार रुपयांचे गंठण चोरले. ही घटना दि. 24 जानेवारी 2020 रोजी घडली असून याबाबत दि. 5 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालीय.
यातील तक्रारदार महिला अनुराधा आनंद गोगटे (वय 64, रा. लक्ष्मीप्रसाद अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा) या व त्यांचे पती दोघेही मुलाकडे पुण्याला गेले होते. दि. 24 रोजी सकाळी पुण्याहून हे दोघेही सातारला येण्यास निघाले. पावणे अकराच्या सुमारास सातारा बसस्थानकावर उतरल्यावर त्यांनी रिक्षा स्टॉपवरुन भाडय़ाने रिक्षा केली व ते मंगळवार पेठेकडे निघाले होते. यावेळी अनुराधा गोगटे यांनी खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये सोन्याचे गंठण ठेवले होते.
तेवढय़ात बसस्थानक परिसरात एका छोटय़ा मुलासह असलेल्या 25 ते 26 वयोगटातील महिलेने रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने त्या महिलेला देखील रिक्षात घेतले. मारवाडी चौकाजवळ रिक्षा चालकाने गाडीत घेतलेली महिला मुलासह उतरुन गेली. त्यानंतर रिक्षाचालकाने गोगटे दांपत्यास मंगळवार पेठेतील त्यांच्या घराजवळ सोडले व तो निघून गेला.
घरी पोहोचल्यावर अनुराधा गोगटे यांनी पर्समधील गंठण कपाटात ठेवण्यासाठी पर्स उघडली. तेव्हा त्यात गंठण नव्हते. मग त्यांनी कदाचित मुलाकडे पुण्याच्या घरी विसरले असावे म्हणून त्यांना फोन करुन विचारले. मात्र त्यांच्याकडे ते नव्हते. त्यांनी शोधाशोध केल्यावर शेवटी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रिक्षात बसलेल्या त्या महिलेने त्यांचे 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेले असल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. याबाबत पोलीस नाईक काळभोर पुढील तपास करत आहेत.
काहीच महिती नसताना तपासाचे आव्हान
अनुराधा गोगटे व त्यांचे पती बसस्थानकावरील रिक्षा स्टॉपवरुन ज्या रिक्षात बसल्या होत्या. त्या रिक्षाचा क्रमांक वा वर्णनही त्यांना माहिती नाही. तसेच जी महिला छोटय़ा मुलासह बसलेली तिचा चेहराही त्यांना आठवत नाही. तसेच रिक्षाचालकाने त्या महिलेलाही रिक्षात का घेतले असावे व तो रिक्षाचालक कोण होता हे शोधून मग गंठण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.








