व्हिडिओ गेम्स खेळण्यात, जिममध्ये कसरत करण्यात घालवतात वेळ
वृत्तसंस्था/ श्रीनगर
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे काश्मिरमध्ये अडकून पडलेले विदेशी फुटबॉलपटू व्हिडिओ गेम्स खेळण्यात आणि हॉटेलच्या जिममध्ये कसरत करण्यात वेळ घालवत आहेत. यातील ब्रिटिश खेळाडूंची परतीची सोय पुढील आठवडय़ात होणार असल्याचे सांगण्यात आले.
झाम्बियाच्या ऍरोन कॅटेबेसह तीन आफ्रिकन आणि सहा ब्रिटिश खेळाडू रिअल काश्मिर एफसी संघातून खेळत असून काश्मिरमधील प्रमुख शहर श्रीनगरच्या हॉटेलमध्ये हे सर्व खेळाडू थांबलेले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे गेल्या महिनत आय लीग फुटबॉल स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला गेला आणि लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद झाल्यामुळे या खेळाडूंना श्रीनगरमध्येच राहणे भाग पडले आहे. या संघाचे स्कॉटिश प्रशिक्षक डेव्हिड रॉबर्टसन व त्यांचा मुलगा मेसन यांनी रिअल काश्मिर एफसीला आय लीगमध्ये खेळणारा हिमालयीन क्षेत्रातील पहिला मजबूत संघ, असा लौकीक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
“अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे,’ असे झाम्बियाचा 28 वर्षीय कॅटेबे म्हणाला. ‘माझी पत्नी व मातापिता यांच्याशी मी सतत संपर्कात आहे. या ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. पण तरीही जेव्हा संपर्क होतो तेव्हा त्यांच्याशी फोनवरून बोलणे होते. मी अजिबात घाबरलेलो नाही. कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास असून सर्व काही ठीक होईल, यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. येथील हॉटेलमध्ये जिमची सोय असल्याने मी त्याचा उपयोग करतो आणि प्लेस्टेशनवर व्हिडिओ गेम्स खेळण्यातही माझा वेळ जात आहे,’ असे त्याने सांगितले.
नायजेरिन लोव्हेडे ओकेचुकव। आयव्हरी कोस्टचे आर्मंड बेझी व नोहेअर क्रिझो, ब्रिटनचे प्रशिक्षक रॉबर्टसन व त्यांची पत्नी व मुलगा हेही या हॉटेलमध्येच राहत आहेत. रॉबर्टसन यांची आई आजारी असून तिच्यावर कर्करोगासाठी केमोथेरपी केली जात आहे. त्यामुळे रॉबर्टसन खूपच चिंताग्रस्त झाले आहेत. अशा वेळी तिच्यासमवेत आपल्याला राहता येत नाही, या भावनेने ते खूप अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यासाठी स्कॉटलंडला जाण्याची लवकरच सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ‘पुढील आठवडय़ात पंजाबमधून विमानाची सोय होईल, अशी आशा वाटते. सध्या काहीही निश्चित सांगता येत नसले तरी ऍबरर्डीनला आम्ही लवकरच सुखरूप पोहेचेन,’ अशी आशा रॉबर्टसन यांनी व्यक्त केली. नेटवर्कची समस्या असल्याने व्हिडिओ कॉल्स करता येत नाहीत. त्यामुळे फक्त बोलण्यावरच समाधान मानावे लागत असल्याने निराशा वाटते, असेही ते म्हणाले.
जम्मू-काश्मिरचा स्वायत्त दर्जा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने येथे अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे फोन, इंटरनेट, वीजप्रवाह खंडित होणे असे प्रकार येथे होत आहेत. पण आता याची सवय झाली आहे. निर्बंधामुळे आम्ही आधी येथे दोन आठवडे येऊ शकलो नव्हतो आणि आता बाहेर जाऊ शकत नाही, अशी स्थिती बनली आहे. येथील हॉटेलमध्ये आम्ही एकूण दहा जण आहोत. पण आता आम्ही फुटबॉलबद्दल बोलणेही सोडून दिले आहे, असे रॉबर्टसन यांनी सांगितले.
अनेक अडचणींना सामोर जात असूनही रियल काश्मिर एफसीने आय लीगमध्ये पदार्पणाच्या मोसमातच जबरदस्त प्रदर्शन केले असून ते जेतेपदाचे दावेदारही मानले जात होते. पण अखेरीस त्यांना तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आय लीगचा उर्वरित मोसम रद्द करण्यात आला आहे. पण अग्रस्थान मिळविलेल्या कोलकात्याच्या मोहन बगान संघाला विजेतेपद बहाल करण्यात आले आहे. रिअल काश्मिरचे सहमालक संदीप छाटू हेदेखील याच हॉटेलमध्ये राहिले असून कठीण परिस्थितीतही खेळाडू एकत्र राहत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘त्यांना येथे ठेवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण आमच्या प्रयत्नांना थोडफार यश आले असून ब्रिटनच्या खेळाडूंच्या परतीची सोय करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात ते मायदेशी परततील. आफ्रिकन खेळाडूंचे वास्तव्य मात्र लांबणार असले तरी ते येथे सुरक्षित आणि आरामात आहेत,’ असे संदीप यांनी सांगितले.









