वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या कोल्लम जिल्हय़ात मच्छिमारांसह मासे पकडण्यासाठी समुद्रातच उडी घेतली. राहुल यांनी तेथील मच्छिमारांशी संवाद साधून त्यांच्या नौकेतूनच प्रवास केला आहे. केरळमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार असल्याने राहुल गांधी हे राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहे. या दौऱयात बुधवारी राहुल यांचे वेगळे छायाचित्र समोर आले आहे.
कोल्लम येथील समुद्रात राहुल गांधी हे मासेमारी करताना दिसून आले. किनाऱयावर पोहोचल्यावर राहुल यांनी मच्छिमारांशी चर्चा करून त्यांच्यासोबत मिळून समुद्रात मासे पकडणारे जाळेही फेकले आहे. शेतकरी जसे जमिनीवर शेती करतात, तशाप्रकारचेच काम मच्छिमार समुद्रात करतात. केंद्र सरकारमध्ये शेतीसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, पण मच्छिमारांचा आवाज उठविणारे स्वतंत्र मंत्रालय नसल्याचा दावा राहुल यांनी यावेळी केला आहे.









