हाथरसला जाताना ‘ड्रामा’ : पीडित कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखले
हाथरस, लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार-हत्या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांचा वाहनताफा गुरुवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ‘ड्रामा’ सुरू होता. राहुल आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना द्रुतगती मार्गावर रोखले. त्यानंतर त्यांनी हाथरसकडे पायी चालत जाण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की, जमिनीवर पाडवणे आणि ताब्यात घेणे अशा वेगवेगळय़ा घटना घडत गेल्या. सायंकाळी पोलिसांनी दोघांनाही अटक करत वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. तसेच दोघांचीही तातडीने विशेष गाडीने आणि कडक सुरक्षेत दिल्लीला फेरपाठवणी करण्यात आली.
उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करत तिची हत्या झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या घटनेचा देशभरातून निषेध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गुरुवारी सकाळी हाथरसला रवाना झाले होते. परंतु, जिल्हय़ात कलम 144 लागू करण्यात आल्याने त्यांचा ताफा यमुना महामार्गावर अडवण्यात आला. तेथून पुढील प्रवास त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. हाथरसकडे जाण्याच्या पवित्र्यात असलेल्या राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी कलम 188 अंतर्गत अटक केली.
सीमा सील, जमावबंदी लागू
गेल्या दोन दिवसांपासून या भागामध्ये आंदोलन सुरू असल्याने आणि राजकीय नेत्यांकडून या प्रकरणाचे ‘राजकारण’ सुरू असल्यामुळे प्रशासनाने सावधगिरीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. हाथरसच्या सर्व सीमा सील केल्या असून कलम 144 लागू केले आहे. यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. हे आदेश 31 ऑक्टोबरपर्यंत लागू आहेत, अशी माहिती हाथरसचे जिल्हाधिकारी पी. के. लक्षकार यांनी दिली.
बाचाबाची अन् धक्काबुक्की
राहुल गांधी यांनी पोलिसांना ‘तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात?’ असा प्रश्न विचारला. कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नसल्याचे पोलिसांनी राहुल गांधी यांना सांगितले. ‘मी हाथरसला जाणारच. कलम 144 लागू असले तरी मी एकटा चालत जाईन. कुटुंबाला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही,’ असा निर्धार राहुल गांधींनी बोलून दाखवला. यावेळी “ये देखो आज का हिंदुस्तान’’ अशी डरकारळीही त्यांनी फोडली. त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी हे रस्त्याच्या कडेला पडले आणि नंतर उठून ते पुन्हा चालू लागले. काही वेळानंतर लागलीच राहुल गांधींना अटक करण्यात आली. त्यांना अटक झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आले. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखले, तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
अंत्यसंस्कारानंतर वातावरण तापले
पीडित तरुणी 4 सप्टेंबर रोजी हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता. तिला दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, मृत्यू झाला. अशातच पोलिसांनी दबाव आणून मध्यरात्रीच पीडितेवर अंत्यसंस्कार उरकायला लावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.









