नितीशकुमार यांचे मतप्रदर्शन : आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचीही स्पष्टोक्ती
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मोठे भाष्य शनिवारी केले. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या उमेदवारीला आक्षेप घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे वक्तव्य केले होते.
कमलनाथ यांच्या वक्तव्यानंतर मतप्रदर्शन
राहुल गांधी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठीचे विरोधी पक्षांचे उमेदवार असतील, असा दावा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नुकताच केला होता. पदयात्रेमुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. जगात आजवर कोणीही 3,500 किलोमीटर इतकी मोठी पदयात्रा केलेली नाही. यासाठी त्यांचे कौतुक करावयास हवे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. या वक्तव्यानंतर नितीशकुमार यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली.
नितीशकुमार शनिवारी पाटणा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि मुख्याध्यापकांना नियुक्तीपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना, ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे विरोधकांचा चेहरा असू शकतात का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आम्हाला यात काही अडचण नाही. सर्वांनी एकत्र मंचावर येत असे निर्णय घ्यावेत असे सुचविले. आपल्याला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सर्व काही एकत्र ठरवले जाईल. अधिकाधिक पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, अशी आमची इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी काम करा. संयुक्त बैठकीत सर्व काही ठरवले जाईल, असेही ते पुढे म्हणाले.









