दिल्लीतील काही लोक ‘लोकशाही’ शिकवत असल्याचा टोमणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीमधील काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रतिआरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे शनिवारी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुष्यमान भारत योजना लागू केल्यानंतर ते बोलत होते.
भारतातील लोकशाही आभासी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणाऱया प्रत्येकाला दहशतवादी ठरवले जात आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱयांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत. तीन-चार कुडमुडय़ा भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यात गुंतलेले आहेत, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले होते. या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. पाँडिचेरीत कितीतरी वर्षे निवडणुकाच घेतल्या जात नाहीत यावरूनच ते लोकशाहीप्रती किती गंभीर आहेत हे दिसून येते, असा टोमणा हाणला.
विविध दाखल्यांसह आरोपांची चिरफाड
दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचे उदाहरण आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. “काही राजकीय लोक सारखे लोकशाहीवर लेक्चर देत असतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही पाँडिचेरीमध्ये स्थानिक निवडणूक झालेली नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच पंचायतस्तरीय निवडणुका झाल्याचा फरक विरोधकांचा दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा दाखवून देतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.









