कोल्हापूर / प्रतिनिधी
रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या, यासह विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनातील मागण्या अशा, रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्या. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करावा. शेतक-यांना विकली जाणारी खते कमाल किरकोळ दरापेक्षा जादा दराने विकली जाणार नाहीत याची खात्री करण्यात यावी. बाजारामध्ये सध्या 10:26:26, पोटॅश, डी.ए.पी. या खतांची टंचाई आहे. राज्याचे कृषि मंत्री यांनी नुकतेच खतांची टंचाई नसल्याचे म्हटले आहे. तसेच जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत. तेव्हा जुन्या खतांचा साठा किती आहे याची चौकशी करून तो शेतक-यांना जुन्या दराने उपलब्ध करून द्यावा.लिंकींगच्या नावाखाली जोडून खत विकण्याचे आणि ते शेतक-याच्या माथी मारण्यांचे धोरण रद्द करा. पी. एम. किसान योजने अंतर्गत मिळणा-या रक्कमेपैकी जिल्हयातील अनेक शेतक-यांना मागील अनेक हप्ते मिळालेले नाहीत. याबाबत तात्काळ बैठक घेवून संबंधित विभागावर जबाबदारी निश्चित करावी. आणि पी. एम. किसान योजनेचे पैसे सर्व शेतक-यांना वेळेत मिळतील याची खात्री करावी. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर, विकास पाटील, चंद्रकांत कुरणे, प्रा. डी. एम. पाटील, अमोल नाईक, संदेश जाधव, सुरेश साळुंखे, निलेश पेंगार आदींच्या सह्या आहेत.









