प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी दि. 8 आणि 9 रोजी गोव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापावल येथे दोन्ही दिवस सायं. 6 ते 8 रोजीपर्यंत हा मार्गदर्शन सोहळा होणार आहे. यामध्ये समाज कार्यात ज्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे तसेच ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमिका आणि विचार जाणून घेण्याची इच्छा आहे अशा 500 कार्यकर्त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग संघचालक लक्ष्मण बेहरे यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत उत्तर गोवा संघचालक राजेंद्र भोबे, कार्यकारिणी सदस्य शिरीष आमशेकर यांची उपस्थिती होती. बेहरे यांनी सांगितले की, याप्रकारे मार्गदर्शनाचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो परंतु यावेळी त्याचे स्वरुप थोडे वेगळे आहे. पहिल्या दिवशी भय्याजी जोशी कार्यकर्त्यांसमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मांडणार आहे तसेच विचारही व्यक्त करणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर सद्या चर्चेत असलेल्या समस्यांवरही ते भाष्य करणार आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचे आहे त्यांनी ते लिहून पेटीत टाकावे व दुसऱया दिवशी फ्ढक्त या प्रश्नांवर ते उत्तर देणार आहेत.
गोव्यात संघातून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे का तसेच विशेष करुन प्रा. सुभाष वेलिंगकर यांना आमंत्रण देण्यात आले का असा प्रश्न केला असता यावर राजेंद्र भोबे म्हणाले की, ज्यांना संघ माहीत नाही आणि जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे विशेष सत्र आहे. आम्ही सर्व संपादकांना विशेष निमंत्रण दिले आहे तसेच आर्चबिशपांनाही बोलाविण्यात आले आहे. देशभरात संघाची भूमिका ही एकच आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत संघाची समर्थनार्थ भूमिका आहे आणि गोव्यातही तशीच भूमिका आहे.









