प्रतिनिधी / रत्नागिरी :
सलग तिसऱया वर्षी रत्नागिरी शहराने शहर स्वच्छतेमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ स्पर्धेत संपूर्ण देशात रत्नागिरी शहराने 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर देशाच्या पश्चिम विभागामध्ये 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या या श्रेणी मध्ये सर्वोकृष्ट स्वच्छ शहर म्हणून दर्जा प्राप्त केला आहे. रत्नागिरी शहराच्या या सर्वोत्कृष्ठ कामगिरीमुळे तमाम रत्नागिरीकरांची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. त्याचबरोबर खेड शहरानेही देशाच्या पश्चिम विभाग गटात 9 वे स्थान पटकावले आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020 या स्वच्छतेविषयक स्पर्धेत देशभरातील 4 हजार 242 शहरांनी सहभाग घेतला होता. जानेवारी 2020 मध्ये देशातील सर्व राज्यांमधील शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण 2020 पुरस्कारासाठी सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार निकाल तयार झाला. या स्पर्धेतील उच्चतम कामगिरी करणाऱया 42 शहरांची अंतिम निवड केंद्र स्तरावर करण्यात आली. संपूर्ण देशात रत्नागिरी शहराने 10 वा क्रमांक पटकावला आहे.
रत्नागिरी शहराने शहर स्वच्छतेच्या चळवळीमध्ये सलग तीन वर्षे देशपातळीवर यशस्वी कामगिरी करत व त्यामध्ये सातत्य राखत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यापुर्वी 2018 च्या सर्वेक्षणात 26 वा क्रमांक व 2019 चे सर्वेक्षणात 23 वा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये रत्नागिरी शहराने कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱयाचे 100 टक्के वर्गीकरण, घरोघरी जाऊन 100 टक्के कचरा संकलन, संकलित कचऱयायावर शास्रोक्त पद्धतीने प्रक्रिया (खत निर्मिती), प्लॅस्टिक प्रक्रिया, घरगुती घातक कचरा प्रक्रिया असे प्रकल्प यशस्वीपणे साकारले आहेत.
रत्नागिरी शहरातील या स्वच्छताविषय कामगिरीमुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यांच्या पश्चिम विभाग गटात ‘सर्वोकृष्ट स्वच्छ शहर’ म्हणून रत्नागिरीची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरांचे तारांकित मानांकन या उपक्रमात रत्नागिरी शहराने थ्री स्टार(3 Star) मानांकन प्राप्त केले आहे. तसेच हागणदारी मुक्त शहर उपक्रमातदेखील ओडीएफ प्लस प्लस (ODF++) हेही मानांकन मिळवले आहे.









