भाजपचा पत्रकार परिषदेत दावा
प्रतिनिधी /मडगाव
पुढील तीन महिन्यासाठी दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासूका) लागू करण्यात आल्याची घोषणा दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. मात्र, ही घोषणा केल्यानंतर काँग्रेस पक्षाने जोरदार हरकत घेतली आहे. लोकआंदोलने चिरडण्यासाठीच हा कायदा लागू केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर काल मडगाव भाजपने पत्रकार परिषद घेऊन गुंडावर कारवाई करण्यासाठीच तो लागू केल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा कायदय़ा सदंर्भात काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिनेश गुंडू राव यांची दिशाभूल केल्यानेच त्यांनी चुकीचे विधान केले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जर जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिक माहिती मिळविली असती तर त्यांना सुद्धा रासूका का जारी करण्यात आला याचे उत्तर मिळाले असते. मात्र, त्यांनी तशी तसदी घेतली नाही व दिनेश गुंडू राव यांची दिशाभूल केल्याचे शर्मद पै रायतूरकर म्हणाले.
खारेबांद-मडगाव येथे हल्लीच नावेलीच्या एका युवकावर खुनी हल्ला झाला होता. या खुनी हल्ल्यात गुंतलेले आरोपी हे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना जवळचे होते. त्यामुळे काँग्रेसचा एक माजी नगरसेवक या गुंडांची सुटका करण्यासाठी मडगाव पोलीस स्थानकात गेला होता असा दावा यावेळी शर्मद रायतूरकर यांनी केला. अशा गुंडांवर वचक ठेवण्यासाठीच हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा जारी करण्यात आलेला आहे व तो प्रशासनाचा एक भाग असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
किती गुंडावर कारवाई होणार याची माहिती नाही
दक्षिण गोव्यातील काही गुंडांना तडीपार करणे तसेच काहीवर कारवाई करण्यासदंर्भात जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्ताव पोचलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी रासूका जारी केल्याचे शर्मद रायतूरकर म्हणाले. या संदर्भात पत्रकारांनी त्यांना किती गुंडांवर कारवाई होणार असा सवाल केला असता, आपल्याला त्याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मडगाव मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, माजी अध्यक्ष सुबोध गोवेकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर उपस्थितीत होते.









