वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील सोनेपत येथे होणाऱया राष्ट्रीय सराव शिबिरासाठी भारताचे अव्वल टेबल टेनिसपटू गुरुवारी एकत्रित आले आहेत. सदर सराव शिबिर 40 दिवसांचे राहील. कोरोना महामारीमुळे जवळपास सात महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय टेबल टेनिसपटू शिबिरासाठी एकत्रित होत आहेत.
सोनेपतमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये हे सराव शिबिर आयोजित केले असून या शिबिरात अचंता शरथ कमल सहभागी होत आहे. या शिबिरासाठी विविध राज्यांचे टेबल टेनिसपटू बुधवारी येथे दाखल झाले. या टेबल टेनिसपटूंना पाच दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, जी. साथीयान, मनिका बात्रा या सराव शिबिरात सहभागी होणार नाहीत. पोलंडमधील स्पर्धेत भाग घेतल्यानंतर साथीयानचे नुकतेच मायदेशी आगमन झाले आहे. तर पुण्यामध्येच मनिका बात्राने आपला सराव पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जर्मनीत प्रशिक्षण घेत असलेला हरमित देसाई तसेच श्रीजा अकुला या सराव शिबिरात दाखल होणार नाहीत. 2018 च्या सप्टेंबरपासून भारतीय टेबल टेनिसपटूंना आजपर्यंत कोणताही अधिकृत प्रशिक्षक लाभलेला नाही.









