वार्ताहर/ कुडची
रायबाग तालुक्मयातील कुडची येथे कोरोनाने थैमान घातले होते. त्या काळात नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱयांना घेऊन जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम केले. त्यामुळे शहर कोरोनामुक्त झाल्याने गौरवास पात्र असल्याचे प्रशंसापत्र नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून कुडची नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांना आले आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य जगदीश हिरेमनी यांनी हे प्रशंसापत्र पाठविले आहे.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यात प्रशासन, पोलीस, आरोग्य खाते व नगर परिषदेच्या कर्मचाऱयांनी कोरोना योद्धा म्हणून केलेले काम अविस्मरणीय ठरले आहे. सफाई कर्मचाऱयांनी गल्लोगल्ली जाऊन आपले काम चोख बजावले. त्यांच्यासोबत आपणासह अन्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी होते. सर्वांच्या एकजिनसी प्रयत्नामुळे कुडची येथून कोरोनाची साखळी तुटली आहे. त्यासाठी आपले प्रयत्न व मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे महाजन यांना आलेल्या प्रशंसा पत्रात म्हटले आहे.









