वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड 19 चा भारतीय बॉक्सिंगला मोठा फटका बसला असून एनआयएस पतियाळा येथील राष्ट्रीय शिबिरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने चिंताही वाढली आहे. बॉक्सर्स, प्रशिक्षण पथकातील साहायक स्टाफमध्ये ही संख्या वाढली असून पुरुष पथकाचे राष्ट्रीय प्रशिक्षक जयसिंग पाटील यांची त्यात आता भर पडली आहे.
त्यांना कोरोनाची हलकी लक्षणे असल्याने पतियाळातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याआधी प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक सीए कुट्टाप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बाधा झालेल्या बॉक्सर व प्रशिक्षक स्टाफमधील सदस्यांची एकूण संख्या आता 13 झाली आहे. त्यात चार बॉक्सर्स दीपक कुमार, मोहम्मद इस्ताह खान, मनजीत सिंग, नरेंदर कुमार यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी याआधीच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पतियाळा येथे दक्षता म्हणून घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत कुट्टाप्पा यांच्यासह चार मुष्टियोद्धेही पॉझिटिव्ह आढळले होते. त्याच्या दुसऱया दिवशी मोहम्मद इस्ताह खानही पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाच्या प्रसाराला आळा बसावा यासाठी पदाधिकाऱयांनी शरीराचा संपर्क होणारे बॉक्सर्सचे सराव सत्र थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. शरीराचा संपर्क येणार नाही, अशा ट्रेनिंगला प्रशिक्षकांकडून परवानगी दिली जाणार आहे. बॉक्सर्सना मात्र आपल्या सहकाऱयांना न भेटण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. कोरोनाबाधित सर्व सदस्यांना मेजर ध्यान चंद हॉस्टेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 21 ते 31 मे या कालावधीत होणाऱया वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपसाठी चाचणी लढतीही थांबवण्याचा निर्णय बीएफआयने घेतला आहे. चाचणी लढती 5 व 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार होत्या.









