आदर्श गुंड करणार खुल्या गटातून राज्याचे प्रतिनिधित्व
प्रतिनिधी / इंदापूर
उत्तरप्रदेशातील अमेठी येथे 16 ते 21 सप्टेंबर अखेर होणाऱ्या २३ वर्षाखालील तिसऱ्या फ्री- स्टाईल मुले राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ आज जाहीर करण्यात आला. खुल्या गटातून आंतरराष्ट्रीय पदक विजेता आदर्श गुंड महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
इंदापूर, जि. पुणे येथील स्व. रंगनाथ मारकड कुस्ती केद्रात सकाळी निवड चाचणीला सुरवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. यावेळी प्रदीप गारटकर, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष प्रा.बंकट यादव, प्रा. दिनेश गुंड, ललित लांडगे, शेखर शिंदे, मारुती मारकड उपस्थितीत होते. कोरोना महामारी मुळे वर्षभराच्या प्रदिर्घ काळानंतर राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीच्या कुस्त्याचा थरार चांगलाच रंगला. कुस्तीशौकिनांना प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेता आला नसला तरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने युट्यूब आणि फेसबुक च्या माध्यमातून निवड चाचणीचे लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे कुस्तीशौकिन,प्रशिक्षक,पालक यांनी घरी बसून निवड चाचणीतील चुरशीच्या लढतीचा आनंद घेतला.
चाचणी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
५७ किलो सौरभ इगवे ,६१ किलो सुरज कोकाटे, ६५ किलो सौरभ पाटील ,७० किलो रविराज चव्हाण ,७४ किलो प्रथमेश गुरव ,७९ किलो सुरज शेख ,८६ किलो बाळू बोडके ,९२ किलो ओंकार जाधवराव ,९७ किलो सुनील खताळ ,१२५ किलो आदर्श गुंड.
निवड झालेला संघ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. यशस्वी मल्लांचे प्रशिक्षक, पालक आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रीकोरोमन आणि महिलांच्या लढती
आज 5 सप्टेंबर रोजी निवड चाचणीच्या आखाड्यात ग्रीको रोमन आणि महिला गटातील कुस्त्याच्या लढतीचा मुकाबला रंगणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी कुस्तीशौकिनांना घरी बसून स्पर्धेतील कुस्त्याचा आनंद घेता येणार आहे.









