प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणाचा प्रत्येक खेळाडूने पुरेपूर उपयोग करून राष्ट्रीय पातळीवर आपल्या जिल्हय़ाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
जिल्हा ऍक्वेटिक फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गमार्फत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फेडरेशनचे संचालक रामदास सांगवेकर, कुंभार समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, कोकण प्रदेश अध्यक्ष विलास गुडेकर, दिलीप हिंदळेकर तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व फेडरेशनचे पदाधिकारी आदित्य सांगवेकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते व ऑलम्पियन सौरभ सांगवेकर उपस्थित होते. तसेच फेडरेशनचे सदस्य संदीप गावडे, स्थानिक प्रशिक्षक प्रविण सुलोकार, दीपक सावंत, स्वप्निल देवळेकर, मंगेश माने उपस्थित होते. या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणात या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील जलतरण सहायक प्रशिक्षक कृष्णा निषद (बंगलोर) मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती फेडरेशनकडून देण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील खेळाडूंना राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने स्वयंशिस्त पाळून प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरारील खेळाडू निर्माण व्हायला पाहिजेत. त्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून वेळोवेळी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन क्रीडा अधिकारी शिंदे यांनी दिले. यावेळी रामदास सांगवेकर व उपस्थित अन्य मान्यवरांनीही क्रीडापटूंना मार्गदर्शन केले.









