उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चॅम्पियनशिपचे आयोजन, नरसिंग यादव लक्षवेधी खेळ साकारण्यासाठी प्रयत्नशील
गोंडा (उत्तर प्रदेश) / वृत्तसंस्था
आजपासून (गुरुवार दि. 11) खेळवल्या जाणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुनरागमन करणारी गीता फोगट व वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेती सरिता मोर यांच्यातील ब्लॉकबस्टर लढत मुख्य आकर्षण केंद्र ठरणार आहे. नरसिंग यादव व गौरव बलियान देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. 32 वर्षीय गीता 2018 मध्ये अपत्यप्राप्तीनंतर येथे व्यावसायिक कुस्तीत प्रथमच उतरणार आहे.
59 किलोग्रॅम वजनगटातून गीता फोगट या स्पर्धेत स्वतःचा फॉर्म आजमावून पाहणार असून येथील कामगिरीच्या माध्यमातून 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारीबाबत तिला निर्णय घेता येऊ शकेल. 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ही अनुभवी मल्ल नव्या नियमांशी कसे जुळवून घेईल, हे देखील येथे स्पष्ट होऊ शकेल. यापूर्वी राज्य स्तरावरील चाचणी स्पर्धेत हरयाणाच्या 4 स्पर्धकांवर मात करत तिने उत्तम चुणूक दाखवून दिली होती.
मागील महिन्यात ओस्लो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणारी सरिता मोर ही गीताची मुख्य प्रतिस्पर्धी ठरु शकते. सरिताने ओस्लो येथे विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन लिंडा मोरेस हिला कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत मात दिली होती. बजरंग पुनियाशी विवाहबद्ध होणारी संगीता फोगट हिने देखील दुखापतीतून सावरल्यानंतर अलीकडे पुनरागमन केले आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायल जिंकली असल्याने या स्पर्धेत तिच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. संगीता 62 किलोग्रॅम वजनगटातून लढणार आहे.
युवा सोनम मलिक ढोपरावरील शस्त्रक्रियेनंतर अद्याप पूर्ण सावरलेली नाही. त्यामुळे, 62 किलोग्रॅम वजनगटात तिची उणीव असेल. याशिवाय वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेती अंशू मलिक, फॉर्ममध्ये परतण्यासाठी झगडत असलेली विनेश फोगट हे देखील या स्पर्धेत खेळणार नाहीत.
पुरुष गटात ऑलिम्पिक स्टार बजरंग व रवि दहिया, दीपक दहिया येथे खेळणार नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत नरसिंग यादववर मुख्य फोकस असेल. 4 वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतर पुनरागमन केलेल्या नरसिंगला यापूर्वी दिल्लीतील वर्ल्ड ट्रायल्समध्ये पराभव पत्करावा लागला होता.









