नऊ पदकासह स्पर्धेत दबदबा; दोघांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
औंध / प्रतिनिधी :
अमेठी (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्णपदकसह २ रौप्य आणि ५ कास्यपदकाची लयलूट करीत स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले.
पुरुष फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे (६१ किलो) वजनगटात आंतरराष्ट्रीय मल्ल रविंदर (सेना दल) याला अटीतटीच्या लढतीत ९- ८ अशा गुणफरकाने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. तसेच 130 किलो वजनगटात पुण्याच्या आदर्श गुंड याने राजस्थान, चंदीगडच्या मल्लांना धूळ चारुन आगेकूच ठेवली मात्र त्याला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. ५७ किलो गटात सौरव इगवे (सोलापूर ) याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ६५ किलो गटात सौरभ पाटील (राशिवडे जि.कोल्हापूर ) याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ७९ किलो गटात समीर शेख ( सोलापूर ) यानेकास्यपदक मिळवले.
ग्रीकोरोमन प्रकारात :- ७७ किलो गटात गोकुळ यादव (मुंबई ) यानेही कास्यपदक पटकावले.
महिला गटात:-५३ किलो गटात स्वाती शिंदे (मुरगूड जि. कोल्हापूर) हीने कास्यपदकाची कमाई केली. ५९ किलो गटात (अ.नगर) येथील इंटरनँशनल कुस्ती संकुलातील भाग्यश्री फंड हिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले त्यामुळे ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. ६२ किलो गटात (अ.नगरच्या) सोनाली मंडलिक हिने कास्यपदकाची कमाई करुन महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. यशस्वी मल्लांचे प्रशिक्षक, कुस्तीशौकिन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्तीसंकुलाची सुवर्ण भरारी
सौरभ इगवे (57 किलो) आणि सुरज कोकाटे (61 किलो) या दोघांनी सोनेरी कामगिरी केली. दोघेही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जूनवीर काका पवार शिवछत्रपती गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.त्यांची सैबेरिया येथे होणाऱ्या जागतिक २३ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे .
कुस्तीपंढरीला दोन पदके
राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीपंढरीतील मुरगूड येथे दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी स्वाती शिंदे आणि वीर हनुमान तालीम राशिवडे येथे सागर चौगुले यांच्याकडे सराव करीत असलेल्या सौरभ पाटील या दोघांनी अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदकाची कमाई करून कुस्तीपंढरीची मान उंचावली.









