वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिसेंबर महिन्यात आयोजित केलेली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोरोना महामारी परिस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 2021 सालातील जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवडय़ात घेतली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिली आहे.
देशामध्ये सध्या हिंवाळी मोसम सुरू झाला असून कोरोनाच्या प्रसारामध्ये पुन्हा वाढत होत असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या बिकट परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सदर स्पर्धा डिसेंबरमध्ये घेणे धोक्याचे ठरेल त्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता 2021 च्या हंगामात दोन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होतील. उत्तरप्रदेशमधील गोंडा येथे 18 ते 20 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेण्याचे ठरले होते पण उत्तरप्रदेशमधील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. 12 ते 18 डिसेंबर दरम्यान सर्बियात होणाऱया विश्व़चषक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय पथक पाठवून देण्यासाठी फेडरेशन सज्ज झाले आहे.









