नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची लागण झाल्याने सर्वप्रथम कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा आणि त्यानंतर दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देशात ‘राष्ट्रीय आणीबाणी’ जाहीर केली आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे परिस्थिती गंभीर बनलेली असतानाच महाराष्ट्रात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. कोरोनाच्या चौकशीसाठी त्यांचे नमुने नागपुरात पाठविण्यात आले असून रविवार किंवा सोमवारी अहवाल प्रात्प झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे मोदी सरकारने कोरोना हे राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. त्यानुसार आता परिस्थितीनुरुप सरकार वेगवेगळय़ा वेळी कोणताही बचावात्मक निर्णय घेऊ शकणार आहे. तसेच केंद्र सरकारने आता मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याची घोषणाही केली आहे. सध्या केंद्रासह विविध राज्यांनी आपापल्या पातळीवर सावधगिरीच्या उपाययोजना केल्या आहेत. गर्दी करणाऱया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून शाळा-महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. तसेच
मुंबई सौदी अरेबियातून परत आलेल्या एका वृद्धेचा शनिवारी महाराष्ट्रातील बुलढाण्यात मृत्यू झाला. 71 वषीय वृद्ध व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय होता. संबंधित मृत इसमाचा मुलगा काही दिवसांपूर्वीच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता. त्यामुळेच त्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्यांच्या नमुन्यांचा तपास अहवाल रविवार किंवा सोमवारपर्यंत येऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार संबंधिताला मधुमेह आणि हायपर टेन्शनचा त्रास होता. बुलढाण्यातील चिखली येथे राहणारे वयोवृद्धाला तब्येत बिघडल्याने रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर, शनिवारी सकाळी कोरोनाने लक्षणे दर्शविली तेव्हा अलगाव वॉर्ड येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी 4.20 वाजता वृद्धाचा मृत्यू झाला. आता वयोवृद्ध कुटुंबातील इतर सदस्यांना घरामध्येच राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 26 जण,
देशातील रुग्ण 90 च्या घरात
महाराष्ट्रातील 26 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 17 होती. त्यानंतर नागपूरसह विविध शहरांमध्ये आणखी काही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असतानाच देशातील रुग्णांचा आकडा जवळपास 90 च्या घरात पोहोचल्याने वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली. तसेच याचा सामना करण्यासाठी राज्यांना 50 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 3.69 लाख कोटी रुपये इतका निधी देणार असल्याचेही जाहीर केले. यापूर्वी स्पेननेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. अमेरिकेत आतापर्यंत 1100 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. तब्बल 11 वर्षांनी अमेरिकेवर आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की आली आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “येणाऱया काळात आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता त्याग केला तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल’’ असे स्पष्ट केले.
…………
विषाणूचे स्वरुप उलगडण्यात भारताला यश
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असताना दुसरीकडे कोविड-19 विषाणूचे स्वरुप उलगडण्यात भारताने यश मिळवले आहे. अशापद्धतीचे संशोधन करणारा भारत हा पाचवा देश ठरला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही कामगिरी पार पाडली आहे. भारतासह चीन, जपान, थायलँड आणि अमेरिका या देशांनी कोरोना विषाणूसंबंधी वेगवेगळय़ा पातळीवर संशोधन केले आहे. कोरोना विषाणू एकाकीपणात सहज येत नाही. आता त्याचे स्वरुप उलगडण्यात यश आले असून पुढे औषध तयार करणे आणि त्याची चाचणी करणे सुलभ होईल, असे आयसीएमआरचे वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
आयसीएमआरच्या संशोधनामुळे आता कोरोना विषाणूचा संपूर्ण नमुना मानवी शरीराबाहेर ठेवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. कोरोना विषाणूचे पृथक्करण करणे कठीण आहे, कारण भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या फारच कमी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. या संशोधनासाठी घशातून आणि नाकातून घेण्यात आलेल्या एकूण 21 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर ती यशस्वी झाली आहे. तेथे 11 चाचणी पॉझिटिव्ह आल्या, त्यापैकी 8 विषाणूंचे स्वरुप वेगळे करण्यात यशस्वी झाले.









