ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने माजी उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 77 वर्षीय बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने उमेदवारी निश्चित झाली आहे. बायडेन यांचा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी हा तिसरा प्रयत्न असून ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवतील.
बायडेन हे बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी 36 वर्षे सिनेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरवण्यासाठी अमेरिकेतील सात राज्ये आणि ‘डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’ मध्ये झालेल्या प्रायमरीमध्ये मिळालेल्या मतांमुळे बायडेन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. व्हर्जिनिया, टेनेसी, नॉर्थ कॅरोलिना, आणि टेक्सास येथील प्रायमरी निवडणुकांमधील कामगिरीने बायडेन यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे. तेथील कृष्णवर्णीय लोकांचा त्यांना जोरदार पाठिंबा आहे.









