वॉशिंग्टन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मागच्या वर्षी पार पडली. यामध्ये भारतीय-अमेरिकन (मूळ भारतीय) असणाऱया जनतेने सर्वाधिक मतदान केल्याची माहिती आहे. प्रसारमाध्यमाच्या विविध एजन्सीजच्या अहवालानुसार यामध्ये भारतीयांनी जवळपास 71 टक्के इतके मतदान केल्याचे म्हटले आहे. यातही आशियाई-अमेरिकन या समुदायाने सर्वाधिक प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले आहे. संशोधक कार्तिक रामकृष्णन यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अमेरिकेतील सध्याच्या लोकसंख्येवर आधारीत सर्वेक्षण केले असून यात वर्ष 2020 मधील निवडणुकीत आशिया-अमेरिकन आणि प्रशांत क्षेत्रातील वासियांनी मतदान केल्याच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ राहिल्याचे नमूद केले आहे. सदरच्या अहवालाची माहिती देताना रामकृष्णन यांनी अशीच निवडणूक वर्ष 2016 मध्ये झाली होती परंतु 2016 च्या तुलनेत अमेरिकेतील भारतीयांचे मतदान करण्याचे याखेपेचे प्रमाण हे 9 टक्क्यांनी वाढले असल्याचे सांगितले आहे.









