सीए व्यवसायासमोर अनेक आव्हाने
आज 1 जुलै. चार्टर्ड अकौंटंट्स डे त्यानिमित्त…

बघता बघता सीए व्यवसायाला 72 वर्षे पूर्ण झाली. 1 जुलै 1949 रोजी सी ए कायदा आणि सी ए संस्था अस्तित्वात आल्या. सी ए म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंट.
साधारणतः सी ए म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळय़ांसमोर येते, ती एक जड परीक्षा आणि ती वर्षानुवर्षे देत राहणारे विद्यार्थी. या परीक्षेचा अभ्यासक्रम एकतर वैविध्यपूर्ण, कठीण आणि बदलांचा वेध कायम घेत राहणारा. म्हणून उत्तीर्ण होणं थोडं कठीण. त्यात फक्त प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणं पुरेसं नाही. त्याशिवाय प्रत्येक गटातल्या गुणांची बेरीज पन्नास टक्के होण्याचीही अट आहे. ही परीक्षा प्रत्येकाच्या अद्ययावत ज्ञानाचाही कस पाहते. प्रत्येक विषयातले कायम बदलत जाणारे ज्ञान असणे हे आवश्यक मानले जाते. हा सर्व अभ्यास करत असताना सी ए असणाऱया व्यक्तीच्या हाताखाली व्यावसायिक प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे. या सर्व गोष्टींमुळे सी ए व्हायला काहीसा जास्त काळ लागू शकतो.
व्यवसायासाठी अमर्याद क्षेत्रे
सी ए झाल्यावर व्यवसायात विविध प्रकारचे काम करता येते. ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना कंपन्या किंवा सी ए फर्ममध्ये चांगल्या संधी उपलब्ध असतात. ज्यांना व्यक्तिगत व्यवसाय करायचा आहे त्यांना लेखा परीक्षण, कर सल्ला, कॉस्टिंग, व्यवस्थापन सल्ला, नवनवीन कायद्यांचे व्यवस्थापन, व्यवसाय वृद्धी, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान ही व इतर खूप क्षेत्रं उपलब्ध असतात.
सी ए व्यवसाय हा ग्राहकाच्या फायद्याचा आहे हे सांगताना एक मजेशीर उदाहरण दिले जाते. वकिलाचा व्यवसाय हा भांडणे वाढतील तितका वाढतो. डॉक्टरचा व्यवसाय हा रोग वाढतील तितका वाढतो. पण सी ए चा व्यवसाय हा ग्राहकाची भरभराट होईल तितका वाढतो असे म्हणतात.
सी ए संस्था
वर्षातून दोनवेळा या संस्थेच्या परीक्षा सर्वत्र घेण्यात येतात. अभ्यासक्रम, शिक्षण व्यवस्था, शिस्तपालन, निरंतर शिक्षण प्रक्रिया या सर्व बाबतीत ही संस्था अत्यंत दर्जेदार म्हणून गणली जाते. आज सी ए व्यवसायासमोर कोणती आव्हाने उभी आहेत हे समजून घेण्यासाठी भारतातल्या काही महत्त्वाच्या सी ए लोकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपापली मते मांडली.
राष्ट्राच्या उभारणीत योगदान
सी ए आदित्य गुप्ता (दिल्ली) यांच्या मते व्यवसाय सुरू केल्यावर ग्राहक व संस्थात्मक लेखा परीक्षण मिळण्यात खूप अडचणी येतात. तसेच कामाच्या तुलनेत खूपदा पुरेसा मोबदला मिळत नाही. सी ए एस. एस. प्रसाद (बेंगळूर) यांच्या मते काही वर्षे व्यवसाय केल्यावर स्थिरता राखणे याबरोबरच सतत बदलत्या नियमांशी जुळवून घेणे हे आव्हानात्मक ठरते. सी ए रामानुज झंवर (पुणे) यांच्या मते विद्यार्थांना सतत बदलत्या नियमांचे प्रशिक्षण देणे व सर्व प्रकारच्या सेवा एका फर्मने देणे यात मर्यादा येतात. सी ए अजित याडकीकर (औरंगाबाद) यांच्या मते मोठे ग्राहक मिळविणे, दर्जेदार नोकरवर्ग टिकविणे, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही आजची आव्हाने आहेत. सी ए विशाल कोटलवार (लातूर) यांच्या मते स्पर्धात्मकता, कर सल्लागार व्यावसायिकांशी स्पर्धा ही महत्त्वाची आव्हाने आहेत. सी ए यश बोथरा (रायपूर) यांच्या मते सातत्याने होणारे बदल व कामांचा अपुरा मोबदला हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. सी ए शीला श्रीराम (चेन्नई) यांच्या मते व्यक्तिगत व्यवसाय वाढविणे व सेवेत वैविध्य राखणे हे कठीण आहे. सी ए पार्थ मोदी (मुंबई) यांच्या मते ग्राहकांना नियम पाळणे नको असणे व त्यामुळे नकळत सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार वाढणे हे खूपदा त्रासदायक ठरते. सी ए उमंग ठक्कर (भुज) यांच्या मते काम पूर्ण करण्यासाठी असणाऱया कालमर्यादा, लहान शहरांमध्ये असणारे मर्यादित पर्याय, वेळेत ग्राहकांनी मोबदला न देणे या अडचणी येतात. सी ए श्रीहरी उल्लोडी (बेंगळूर) यांच्या मते बदलत्या कायद्यांचे पुरेसे प्रशिक्षण सरकारी पातळीवर न मिळणे व विविध बदल केले जाताना सी ए व्यावसायिकांचे मत विचारात न घेणे हे वेदनादायक आहे. सी ए आनंद मुथा (नाशिक) यांच्या मते सी ए व्यावसायिकांच्या मोठय़ा फर्म उभ्या करणे हेच मोठे आव्हान असून बाकीचे प्रश्न योग्य मनोवृत्ती, तारतम्य आणि तंत्रज्ञानाची कास धरण्याने सुटू शकतात. सी ए यशवंत आनंद (चेन्नई) यांच्या मते गुणवत्ता आणि क्षमता असूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामे करण्याचे धाडस सहसा केले जात नाही, हे व्यवसायाचे मोठे आव्हान आहे. सी ए बी. हरी (कोईमत्तूर) यांच्या मते सी ए व्यावसायिक जाहिरात करू शकत नाहीत. शिवाय, सर्व सेवा द्याव्यात की मर्यादित सेवाक्षेत्र ठेवावे हे ठरविणे बऱयाचदा कठीण जाते. सी ए मनोजकुमार अगरवाल (पुणे) यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठय़ा संस्था लेखा परीक्षण व इतर कामे काबीज करत आहेत. तिथे भारतीय फर्म मोठय़ा होणे आवश्यक बनले आहे. लहान फर्मना कामासाठी आवश्यक संसाधने व सामग्री मिळण्यात अडचणी येतात. सी ए चिन्मय नाग (कलकत्ता) यांच्या मते मोठय़ा संस्थांकडे कामाचे केंद्रीकरण झाल्याने लहान फर्मना पुरेशी कामे योग्य मोबदल्यात मिळणे कठीण झाले आहे.
अर्थात बदलत्या आव्हानांचा वेध घेणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे हे सी ए संस्था आणि व्यावसायिकांनी केले नसते तरच नवल. आज यामुळेच फर्म, एल एल पी, एम सी एस कंपनी अशा विविध रूपांमधून हा व्यवसाय जास्त समाजव्यापी होत आहे. आव्हानं पेलण्याची ताकद सी ए चा अभ्यासक्रम सभासदांना निश्चितच देतो. त्यामुळेच राष्ट्र उभारणीत सी ए व्यवसायाचे योगदान कायम महत्त्वाचे ठरले आहे.
– सी ए सुजीत सुंठणकर
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे डॉक्टर-सीए यांचा आज गौरव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे दि. 1 जुलै या डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकौंटंटस यांचा महिला विद्यालय येथे दुपारी 2.30 वा. सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ज्या डॉक्टर तसेच चार्टर्ड अकौंटंट्स यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे. या कार्यक्रमाला इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे सहकार्य लाभले आहे.
डॉ. मंजुनाथ

डॉ. मंजुनाथ हे ए. डी. व डी. एम. पदवीधर आहेत. म्हैसूर सरकारी मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम. बी. बी. एस., नागपूर सरकारी मेडिकल कॉलेज येथून एम. डी. व किंग एडवर्ड हॉस्पिटल मुंबई येथून डी. एम. ही पदवी घेतली. नागपूर मेडिकल कॉलेज, केईएम हॉस्पिटल येथे निवासी डॉक्टर म्हणून व नंतर सुपर स्पेशालिटी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले. सध्या केएलई हॉस्पिटल आणि गौरोशी क्लिनिक येथे ते काम करतात. कोरोना काळात त्यांनी दीड हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. गौरोशी यांना त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. रुपाली शिंदे

डॉ. रुपाली शिंदे यांनी मुंबईच्या टोपीवाला मेडिकल कॉलेजमधून एम. डी. ची पदवी घेतली, शिवाय एचवन एनवन संदर्भात निम्हान्स बेंगळूर येथून व सांसर्गिक रोगासंदर्भात पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमधून खास प्रशिक्षण घेतले. सध्या त्या बीम्सच्या आरटीपीसीआर लॅबोरेटरीच्या नोडल ऑफिसर तसेच असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतात. 18 वर्षांपासून त्या वैद्यकीय सेवेत आहेत.
डॉ. भूषण सुतार

डॉ. भूषण सुतार चंदगड तालुक्मयातील तुर्केवाडी येथील रहिवासी असणारे भूषण सुतार यांचे प्राथमिक शिक्षण तुर्केवाडीत झाले. गडहिंग्लजच्या एम. आर. ज्युनियर कॉलेजमधून त्यांनी पीयुसीचे शिक्षण घेतले, त्यानंतर रुरल मेडिकल आयुर्वेद कॉलेज बेळगाव येथून बीएएमएस पदवी घेतली. 2003 पासून डॉ. अनिल कित्तूर, डॉ. आर. बी. परमेकर, डॉ. विजय देसाई, डॉ. डी. व्ही. गिजरे, डॉ. के. वाय. परमेकर यांचे साहाय्यक म्हणून काम केले. 2006 मध्ये त्यांनी खंजरगल्ली येथे व 2018 मध्ये खडेबाजार येथे स्वतःचा दवाखाना सुरू केला. कोरोना काळात अत्यल्प मोबदल्यात त्यांनी अनेक गरजुंवर उपचार केले.
डॉ. संजय डुमगोळ

डॉ. संजय डुमगोळ एम.बी.बी.एस. पदवीधर असून, यादवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूजू झाले. अथणी येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्यानंतर खानापूर आणि बेळगाव येथेही त्यांनी काम केले आहे. सध्या ते मनपाचे आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत आहेत.
डॉ. अंबरीश नेर्लेकर

डॉ. अंबरीश एम. डी. पदवीधर असून, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. सध्या तेथेच कोविड केअर युनिटमध्ये काम करत असून, तेथीलच अवयव दान समितीचे सदस्य आहेत. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसीनचे सदस्य आहेत.
डॉ. संजीव नाईक

डॉ. संजीव आयुर्वेदिक मेडिसीन ऍण्ड सर्जरीचे पदवीधर आहेत. लाईफलाईन हॉस्पिलट अनगोळ येथे कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रशासक म्हणून काम केले आहे.
चार्टर्ड अकौंटंट
सी ए एन. जी. गाडगीळ

यांनी 1972 मध्ये सीए ची पदवी घेतली. सीए एन. व्ही शिवणगी यांच्याकडे त्यांनी अनुभव घेतला व त्यानंतर गाडगीळ ऍण्ड उप्पीन ही फर्म सुरू केली. त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. सध्या प्रियदर्शनी आय हेल्थ केअर ऍण्ड रिसर्च फौंडेशनचे ते विश्वस्त असून फौंडेशनतर्फे अनेक नेत्र शस्त्रक्रिया होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
संजीव अध्यापक

संजीव यांनी बी. कॉम. परीक्षेत विद्यापीठात सातवा क्रमांक मिळविला. आर. एल. लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. 1989 पासून त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. सीए संस्थेमध्ये खजिनदार म्हणून काम केले. कर्नाटक लॉ सोसायटीसह अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. 40 वेळा त्यांनी रक्तदान केले असून, प्लाझ्मापण दिला आहे.
गौरी नायक

वयाच्या 22 व्या वषी सीए ची पदवी घेतली व स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. गोगटे कॉलेज व व्हीटीयू येथे त्यांनी काम केले. वेब या संस्थेच्या त्या सदस्या आहेत. बेळगावमध्ये स्टार्टअप सुरू करण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांना संस्कृत भाषा अवगत असून, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ऍन्थोनी डिसोझा

बी. कॉम पदवीधर असून, अनेक बँकांचे ऑडिट ते पाहतात. किर्लोस्कर रोड येथे त्यांचे स्वतःचे कार्यालय आहे.
सी ए शिवकुमार शहापूरकर

यांनी 1995 मध्ये सीए ची पदवी घेतली. 25 वर्षांपासून ते
प्रॅक्टिस करत आहेत. सीए संस्थेमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इक्विटास बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष कोटबागी व अध्यक्ष म्हणून रोटेरियन बबन देशपांडे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2022-23 उपस्थित राहणार आहेत.









