प्रतिनिधी / सातारा :
राष्ट्रवादी प्रणित सर्वसमावेशक पॅनेलची उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाचा अर्ज काढायचा यावर रणनिती परळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर रविवारी ठरली. दि. 7 रोजी उमेदवार निश्चित करुन दि. 9 रोजी उरलेल्यांचे अर्ज मागे घेण्यात येतील, असे या बैठकीत ठरले. ही बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामुळे राष्ट्रवादी पॅनेलच्या या यादीत कोणाकोणाची नावे आहेत त्याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत इच्छूकांनी मोठया संख्येने अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी प्रणित पॅनेलमधून जास्तीत जास्त उमेदवार कसे बिनविरोध करता येतील यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजेंची व्युहरचना सध्या सुरु आहे. विरोधकांच्या नाडय़ा आवळत बँकेची त्यांना पायरी सुद्धा चढू न देण्याचा आराखडाच तयार केला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी प्रणीत सर्व समावेश पॅनेलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा याकरता रविवारी सातारा तालुक्यातील परळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर बैठक पार पडली. त्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले संचालक नितीन पाटील, अनिल देसाई, बिनविरोध निवडून आलेले संचालक राजेंद्र राजपुरे, यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होती.









