कुर्डुवाडी / प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह इतर तिघाजणांवर कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि.३१ रोजी दु.१२.३० वा कुर्डुवाडी नगरपरिषदेत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दत्ता गवळी व संतोष टोणपे, फिरोज खान, राजू शेंबडे (सर्व रा. कुर्डुवाडी ता. माढा ) यांनी येथील नगरपरिषदेत जाऊन प्रभागामध्ये तीन दिवसांपासून पाणी का सोडले नाही ,एमएसआरडीसी झाडे तोडली तरी तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही. तू स्वतःला काय समजतो, तुला बघतोच तुम्ही हारामची पगार खाता, तुम्ही एक तक्रार द्या, मी लाईन लावतो अशी धमकी देऊन कार्यालयात बसून राहून वाद घालून सरकारी काम जबरदस्तीने बंद पाडून सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे हे करीत आहेत.