शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार बैठकीत ऑफर : संजय कोरे यांना दिलेली वागणूकीचा शिवसेनेकडून निषेध : मुख्याधिकाऱ्यांची केबीन म्हणजे राष्ट्रवादीचा आड्डा
प्रतिनिधी/इस्लामपूर
गेली सात पंचवार्षिक नगरपालिका निवडणूकीत निवडून येणारे व राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांना बुधवारी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांच्याकडून मिळालेली वागणूक ही दुर्दैवी आहे. इतकी वर्षे राष्ट्रवादीशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या नेत्याला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था असेल. मुख्याधिकाऱ्यांची केबीन म्हणजे राष्ट्रवादीचा आड्डा असल्याची टीका करत शिवसेनेच्यावतीने जेष्ठ नेते संजय कोरे यांना शिवसेनेची दारे खुली आहेत. त्यांना शिवसेनेत योग्य तो सन्मान मिळेल. असे म्हणत थेट शिवसेनेत येण्याची ऑफर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, माजी नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, अंकुश माने यांची उपस्थिती होती. यावेळी मलगुंडे म्हणाले, संजय कोरे यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या वागणूकीचा आम्ही निषेध करतो. कोरे यांना शिव्या देणाऱ्यांनी आपले अस्तित्व काय हे तपासावे. एक-दोन वेळा निवडून आले म्हणजे तुमची उंची त्यांच्या ऐवढी होत नाही. कोरे यांचे वडील नगराध्यक्ष होते. आणि ते सलग सात वेळा निवडून आले आहेत, असे म्हणत मलगुंडे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.
शकील सय्यद म्हणाले, बुधवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये संजय कोरे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा निंदणीय आहे. नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी एका विशिष्ट पक्षाचे काम करीत आहेत. हे कालच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे. बुधवारी मुख्याधिकाऱ्यांनीच राष्ट्रवादीची बैठक त्यांच्या केबीनमध्ये बोलवली होती. मुख्याधिकाऱ्यांनी गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यापुर्वीच सांगितले आहे. मात्र १ हजार फाईली अद्याप पिडींग आहेत. त्या अजून हलल्या नाहीत. या आडमुठे धोरणामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. शहरात अनेक समस्या वर येत आहेत. स्वच्छतेचे १२ वाजले आहेत. प्रशासन आल्यापासून शहरात ८-८ दिवस घंटागाडी फिरत नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २४ बाय ७ योजना कागदावरच आहे. त्यासाठी कुठला प्रयत्न त्यांनी केलेला नाही. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतही असंतोष असल्याचे सय्यद यांनी सांगितले.