मुंबई \ ऑनलाईन टीम
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीपातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असा आरोप केला. राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन करताना संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
“राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले २० वर्ष बघत आहे. राष्ट्रवादीनं जे केलं ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचं काही नाही,” असं संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यावेळी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं.