प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रविवार दि. 5 ते मंगळवार दि. 7 सप्टेंबर अशा एकूण तीन दिवसांच्या गोवा दौऱयावर येणार आहेत. आयएनएस हंस या तळाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमासाठी ते खास पाहुणे या नात्याने उपस्थित राहाणार आहेत. सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गोवा मुक्तीदिनाच्या 60 व्या वर्षानिमित्त कोविंद हे 19 डिसेंबर 2020 रोजी गोव्यात आले होते आणि त्यांनी पणजीतील कांपाल मैदानावर 60 व्या वर्षाचा शुभारंभ केला होता. आता पुन्हा एकदा ते गोव्यात येत असून त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सरकारतर्फे करण्यात येत आहे.