डीवायएसपी कै. पांडुरंग उसुलकर यांनी उत्तम सेवा बजावली. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करण्यात आला होता. त्यांचे 14 डिसेंबर 2020 रोजी निधन झाले. गुरुवार दि. 24 रोजी 11 वा दिवस. त्यानिमित्त….
पांडुरंग उसुलकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1929 रोजी झाला. गणपत गल्लीतील मराठी शाळा क्रमांक 2 सेंट्रल (मराठा मंडळ हायस्कूल), बी. के. मॉडेल हायस्कूल येथे शिक्षण घेतले. त्यांना मुळातच व्यायामाची आणि खेळाची आवड होती. त्यामुळे शालेय स्पर्धा व इतर स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेतला. कुस्ती, हॉकी, क्रिकेट, कबड्डी, गोळाफेक, धावणे या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके
मिळविली.
त्यांची राज्य राखीव दलाच्या सशस्त्र पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाली. मात्र ते खेळामध्ये भाग घेत असल्याने अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना बढती मिळाली.
ते एक मनमिळावू स्वभावाचे होते. पोलीस दलात प्रामाणिक आणि गुणवत्ता सेवेबद्दल 1986 मध्ये भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. एक नामवंत कबड्डीपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
त्यांना वेळोवेळी बढती मिळत गेल्यामुळे त्यांनी डीवायएसपी या पदापर्यंत झेप घेतली. घरचे कुटुंब सांभाळत त्यांनी ही सेवा बजावली. केवळ नोकरीच नाही तर सामाजिक कार्यामध्येही त्यांनी भाग घेतला होता. सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्येही त्यांनी भाग घेतला होता. मात्र त्यांचे अचानक निधन झाल्याने उसुलकर कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यावेळी अनेकांनी आम्हाला आधार दिला. त्यांचे आम्ही ऋणी आहोत..









