प्रतिनिधी / मंडणगड
राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद 12 फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तालुक्यातील मुळगाव आंबडवेचा दौरा करणार आहेत. या दौऱयासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
सकाळी 10 वाजता राष्ट्रपतींचे शिरगाव हेलिपॅडवर आगमन होणार आहे. राष्ट्रपती सुरक्षा व्यवस्था व स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या उपस्थितीत शिरगाव हेलिपॅड येथून शासकीय मोटारीने ते आंबडवेकडे प्रयाण करतील. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असेल. यात आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट व यानंतर गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणाऱया जाहीर कार्यक्रमात त्यांचा सहभाग असेल.
आंबडवे येथील कार्यक्रमानंतर दुपारी राष्ट्रपती मोटारीने शिरगाव व तेथून हेलीकेप्टरने पुढील प्रवासास जाणार आहेत.
मंडणगडमधील पाच मार्ग बंद राहणार!
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आंबडवे येथे येत असल्याने 12 फेब्रुवारी रोजी मंडणगड तालुक्यातील 5 प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजता मंडणगडमध्ये दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 5 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. म्हाप्रळ चेक पोस्टकडून शेनाळे मार्गे मंडणगड शहरांमध्ये प्रवेश करणारी सर्वप्रकारची वाहतूक शेनाळे फाटय़ापासून बंद राहील. खेड-दापोलीकडून मंडणगड शहरांमध्ये दापोली फाटा मार्गे प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक कुंबळे फाटय़ापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटा मार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाटय़ापर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. बाणकोटकडून पाचरळ फाटा म्हाप्रळ-शेनाळे फाटा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळकडून पेवे-पंदेरी मार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱया नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल.
म्हाप्रळकडून खेड-दापोली-बाणकोटकडे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा येथून कुंबळे मार्गे वळवण्यात येणार आहे. खेड-दापोलीकडून महाडकडे जाणारी वाहतूक कुंबळे-शेनाळे फाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. बाणकोटकडून मंडणगड मार्गे महाडकडे जाणारी वाहतूक देव्हारे, दापोली, कुंबळे, शेनाळे फाटा मार्गे जाणार आहे. म्हाप्रळकडून बाणकोटकडे मंडणगड मार्गे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा, कुंबळे-दापोली-देव्हारे मार्गे बाणकोटकडे जाणार आहे.
आत्तापर्यंत राष्ट्रपती येण्याच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुकावासियांनी चांगले सहकार्य केले असून शनिवारी राष्ट्रपतींच्या दौऱयामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुकावासियांनी योगदान देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी केले आहे.









