प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात 19 डिसेंबर रोजी आगमन होणार असून त्यांच्या आगमनाची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विविध स्तरावर नियोजन करीत आहेत. येथील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती येणार असल्याने पोलिसांनी चार दिवसापूर्वीच आझाद मैदानाचा ताबा घेतला असून सशस्त्र पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी बंदोबस्ताच्या रंगीत तालीमीला सुरुवात केली असल्याने आझाद मैदानाला छावणीचे स्वरूप आले आहे.
गुरुवारी दुपारी मोठय़ा संखेने पोलीस आझाद मैदानावर उपस्थित होते. प्रत्येक निरीक्षकाला व त्यांच्या टीमना त्यांच्या कामाची वाटणी करून देण्यात आली आहे. आज शुक्रवारी प्रत्यक्ष रंगीत तालीम होणार आहे. राष्ट्रपती ज्या ज्या ठिकाणांना भेट देतील त्या ठिकाणीपर्यंतच्या रस्त्यावर तसेच त्या ठिकाणाकडील सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम आज होणार आहे. 19 रोजी संध्याकाळी राष्ट्रपतींचे आझाद मैदानावर आगमन होणार आहे. राष्ट्रपती आझादमैदानावर येणार असल्याने आझाद मैदानाच्या सुशोभीकरणाचे कामही युध्दपातळीवर सुरु आहे. काही ठिकाणी डागडूजी करुन अनेक ठिकाणी नव्या रंगाचा साज चढविण्यात आला आहे. पोलिसांनी मैदान ताब्यात घेतल्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून काम करणाऱया माणसाव्यतिरिक्त इतरांना आझाद मैदानावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना महत्वाच्या कामासाठी मैदानावर जायचे असेल तर त्यांची नोंद करूनच त्यांना सोडले जात आहे. तसेच आझाद मैदानावर जमणाऱया व्यक्तींवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.









