प्रतिनिधी/ पणजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महापौर उदय मडकईकर, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय व इतर मान्यवर उपस्थित होते.
दुपारी 2 च्या सुमारास राष्ट्रपती गोव्यात दाखल झाल्यानंतर ते राजभवनावर गेले. राजभवनावरून ते थेट आझाद मैदानावर आले व नंतर ते कांपाल येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमाला रवाना झाले. सुमारे 25 मिनिटे राष्ट्रपती आझाद मैदानावर राहिले. यावेळी पोलीस पथकांनी मानवंदना दिली तसेच वाद्य पथकांनी धून आळविली.
राष्ट्रपती आझाद मैदानावर येणार असल्याने आझाद मैदान तसेच आजूबाजूच्या परिसरात सशस्त्र पोलिसांसह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या इमारतीतील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. त्या इमारतीतही पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. आझाद मैदानाला छावणीचे स्वरूप आले होते. आझाद मैदानावर येणाऱया प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात होती.









