वृत्तसंस्था/ अहमदाबाद
यजमान भारत आणि विंडीज यांच्यातील अहमदाबादमध्ये 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणारी तीन सामन्यांची वनडे मालिका बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना होणार असल्याची माहिती गुजरात क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. कोरोना महामारी समस्येमुळे ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा हा 1000 वा वनडे सामना असल्याने या सामन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
कोलकात्यातील टी-20 मालिकेसाठी 75 टक्के प्रेक्षकांना परवानगी
कोलकाता ः यजमान भारत आणि विंडीज यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी पश्चिम बंगाल शासनाने स्टेडियम क्षमतेच्या 75 टक्के शौकिनांना उपस्थितीची परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तसेच पश्चिम बंगाल शासनाच्या प्रमुख सचिवानी राज्यातील क्रिकेटच्या हालचालींना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे बंगाल क्रिकेट संघटनेने आभार मानले आहेत. या मालिकेतील प्रत्येक सामन्याला आता 75 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे. सदर मालिका यशस्वीपणे भरविली जाईल, असा विश्वास बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी व्यक्त केला आहे. या टी-20 मालिकेला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. या सामन्यावेळी कोरोना संदर्भातील नियमाचे पालन केले जाईल.









