तेरे चेहरे में वो जादू है. . .
( मुख लक्षण/ PHYSIOGNOMY-चेहऱयावरून वरून माणसाचा स्वभाव आणि शक्यता- भाग-3)
डोळय़ाच्या रंगांचा आणि स्वभावाचा एक खास असा संबंध आहे. ज्या व्यक्तींच्या डोळय़ांच्या बुब्बुळांचा रंग काळा असतो अशा व्यक्ती काहीशा रहस्यमयी असतात. त्यांना पूर्वाभास किंवा इंटय़ुशन चांगले असते. म्हणजे पुढे काय घडणार आहे याची पुसटशी जाणीव त्यांना होत असते. त्यांना सूचक स्वप्नेही पडतात. साधारणतः कर्मठ विचारांचे, आपले तेच खरे करणारे, गुप्तवार्ता आपल्यापर्यंतच ठेवणारे, जबाबदार आणि प्रामाणिक असतात. यांना आयुष्यात फारशा उतार चढावांना सामोरे जावे लागत नाही असे आढळते. यांना आयुष्यात फारशी आर्थिक तंगी कधी जाणवत नाही. पण काळय़ा बुब्बुळांबरोबर डोळय़ाच्या रंगांमध्ये पिवळसर झाक असेल तर अशा व्यक्तींच्या पालकांना कष्टांना सामोरे जावे लागते. घाऱया डोळय़ाच्या व्यक्तींबद्दल नेहमी असेच बोलले जाते की या धूर्त असतात, काव्यबाज असतात पण परिस्थिती थोडी वेगळी आहे. अशा व्यक्ती आकर्षक असतात. यांचे डोळे चुंबकीय असतात. दृढनिश्चयी असतात. आपले म्हणणे समोरच्यापर्यंत ठेवणे यांना थोडे जड जाते. काही वेळेला अशा व्यक्ती आराम पसंत म्हणजे आळशीही असू शकतात. यांना समोरच्याकडून कसे काम करून घ्यायचे हे व्यवस्थित कळते. यांनी जर प्रयत्न केला तर कोणतेही क्षेत्र काबीज करू शकतात. करडय़ा रंगाच्या डोळय़ांच्या व्यक्ती स्वभावात मौजमजा असलेल्या, आराम पसंत, रोमांचक कामामध्ये रस असलेल्या, धाडसी, परिस्थितीशी जुळवून घेणाऱया पण जीवनातल्या एकसुरीपणाला लगेच कंटाळणाऱया अशा असतात. आर्थिकदृष्टय़ा धाडसी निर्णय घेणे याला आवडते. वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा मित्रांबरोबर प्रवास करणे हा त्यांचा आवडता छंद असतो. जीवनात काही वेळेला पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागू शकते. ज्यांच्या डोळय़ांचा रंग हिरवा असतो अशा व्यक्ती अत्यंत आकर्षक, जोशपूर्ण, बुद्धिमान, जिवंत स्वभावाच्या आणि ईर्षा करणाऱया असतात. निळय़ा रंगाच्या डोळय़ांच्या व्यक्ती शांत स्वभावाच्या, बहिर्मुखी दयाळू आणि गंभीर असतात. हे झाले डोळय़ाच्या रंगांबद्दल. आकाराबद्दल म्हणाल तर मोठे पण सुंदर डोळे असलेल्या व्यक्तींवरती लोक विश्वास ठेवतात. पाणीदार डोळे असलेल्या व्यक्ती भावना प्रधान असतात. पण त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना योग्य शब्दांची निवड करता येत नाही. समोरच्या माणसाने न बोलताच आपल्या भावना समजून घ्याव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. बदामासारख्या आकाराच्या गोळय़ाच्या व्यक्ती या निरीक्षक असतात. कोणतीही गोष्ट यांच्या नजरेतून चुकत नाही. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे त्यांना अचूक समजते. थोडय़ाफार स्वार्थी पण दुसऱयाला मदत करण्यासाठी मागे न फिरणाऱया अशा या व्यक्ती असतात. पुढच्या भागात चेहऱयावर तीळ असल्यास अचूक निदान कसे करावे ते सांगतो.
(क्रमशः)
सिंह राशीकरता महाउपायः
शुक्ल पक्षाच्या अष्टमीला सकाळी अंघोळ पूजा करून नवग्रह मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. नवग्रह मंदिरातील सुर्याच्या मूर्तीसमोर पाच संत्री वहावीत. नमस्कार करावा. शक्य असल्यास कंबल दान द्यावे. दर महिन्याच्या चौथा आणि पाचव्या शनिवारी नवग्रह मंदिरात शिरा प्रसाद म्हणून दाखवावा व भाविकात वाटावा. जमल्यास त्या दिवशी उपवास करावा.
सोपी वास्तु टीपः
ईशान्येला पाण्याचे ठिकाण असावे हे जरी ठीक असले तरी छतावर पाण्याची टाकी त्या दिशेला नसावी.
मेष
उत्साहात आणि अति आत्मविश्वासामुळे हातून काही चूक होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ या काळात मिळू शकते. मन थोडेफार धार्मिक होईल. तब्येतीची विशेष काळजी करण्याचे कारण नाही. धनप्राप्तीकरता जास्त कष्ट करावे लागतील, सहजतेने होणार नाही. कौटुंबिक वातावरणात थोडा कलह असण्याची शक्मयता आहे. लहान भावंडांकडून मदत मिळेल. अचानक धनप्राप्ती होऊ शकते.
उपाय लाल गाईला गूळ घालावा.
वृषभ
काही कारण नसताना मन उदास होण्याची शक्मयता आहे. तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असेल. लहान-मोठे आजार दुर्लक्ष केल्यास मोठा त्रास देऊ शकतात. आत्मविश्वासात थोडी कमी येईल पण तुम्ही केलेल्या कामात यश मिळेल यावर विश्वास ठेवा. पैशांच्या बाबतीत हा काळ उत्तम असेल. कौटुंबिक वातावरणात मधुरता येईल. शेजाऱयांकडून त्रास संभवतो. शेअरसारख्या धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहावे.
उपाय देवीला ओटी भरावी
मिथुन
तब्येतीत सुधारणा होत आहे. आशादायक वातावरणामध्ये काम केल्यास चांगले यश मिळू शकते. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुमच्या तारतम्यामुळे इतर लोक अडचणीतून बाहेर निघण्याची शक्मयता आहे. आर्थिक देवाणघेवाण करत असताना सावध राहा. प्रवासात नुकसान संभवते. जमिनीच्या बाबतीत असलेल्या व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये दृढता येईल. नोकरीमध्ये कौतुक होईल.
उपाय गोड खाऊन कामे करावीत
कर्क
चुकीच्या खानपानाच्या सवयीमुळे किंवा व्यसनांमुळे त्रास होऊ शकतो. या काळात तब्येतीची तक्रार जाणवू शकते. कुटुंबातील व्यक्ती लहानसाहान कारणांवरून भांडल्यामुळे अशा गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. स्थावर मालमत्तेच्याबाबतीत ग्रहमान चांगले आहे. छोटी मोठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्मयता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरी गुप्त शत्रूंचा त्रास होईल.
उपाय चांदीची छोटी गोटी जवळ ठेवावी
सिंह
विशेष काळजी घेऊनसुद्धा तब्येत बिघडू शकते. पण घाबरण्यासारखे काही कारण नाही. अंगदुखी किंवा सांधेदुखी त्रास देऊ शकते. कौटुंबिक वातावरण तितकेसे चांगले असणार नाही. या काळात कमावलेला पैसा टिकण्याची शक्मयता कमी आहे. खर्च अचानक होऊ शकतात. प्रवासाचे चांगले योग आहेत. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते.
उपाय रविवारी श्रीरामाचे दर्शन घ्यावे.
कन्या
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ नाही आहे त्यामुळे आपल्याकडून शक्यतो ही काळजी घ्यावी. धनप्राप्ती उत्तम असेल. धनसंचय करण्याकडे कल असेल. कौटुंबिक वातावरण पोषक असेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत पण तब्येत सांभाळून प्रवास करावा. स्थावर मालमत्तेसंबंधी असलेले प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये वृद्धी होईल. गुंतवणूक करण्याकरता योग्य काळ आहे. नोकरीत लहान मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो.
उपाय लहान मुलीला हिरवे वस्त्र भेट द्यावे.
तूळ
प्रकृती उत्तम असेल. वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा जोश येईल. धनप्राप्ती आणि कौटुंबिक समाधान याबाबतीत नशीबवान असाल. खाण्यापिण्यामध्ये असलेला रस वाढेल. वाणीमध्ये मधुरता येईल. प्रवासाची दाट शक्मयता आहे. लहान भावाची मदत करावी लागेल. कम्युनिकेशन स्किल सुधारेल. स्थावर मालमत्तेचे चांगले योग आहेत. शेअर बाजारापासून सावध राहावे. प्रेमसंबंधात तणाव येईल. नोकरीत असमाधानी असाल.
उपाय चांगल्या प्रतीचे अत्तर वापरावे.
वृश्चिक
बऱयाच दिवसानंतर तब्येतीमध्ये सकारात्मक बदल घडतील. याकरता वैद्यकीय मदतीबरोबरच मानसिकतासुद्धा कारणीभूत असेल. पूर्वी हातून दिवसात केलेल्या संधी परत प्राप्त होऊ शकतात. धनप्राप्तीच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. घरात छोटे मोठे फंक्शन होऊ शकते. प्रवासाचे उत्तम योग होत आहेत. जमिनीच्या व्यवहारांमध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. शेअर मार्केटपासून कटाक्षाने दूर रहा.
उपाय वृद्ध व्यक्तीला शक्य ती मदत करावी.
धनु
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम काळ असेल. पूर्वी आजार झाले असतील तर त्यातून सुटका होईल. कुटुंबातील व्यक्ती एकमेकाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आर्थिकदृष्टीने देखील हा काळ चांगला आहे. नवीन दागदागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करू शकता. आर्थिक गुंतवणुकीकरता अनुकूल काळ आहे. प्रेम संबंध सुधारतील. नोकरदार वर्ग आणि मात्र सगळय़ादृष्टीने सावध राहण्याची आवश्यकता आहे.
उपाय दत्तप्रभूंना पांढऱया पेढय़ांचा नैवेद्य दाखवावा.
मकर
आरोग्य सुधारण्याकरता प्रयत्न करणार असाल तर अतिशय उत्तम कालावधी आहे. वाईट सवयी सोडण्यासाठी आणि चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठीदेखील हा काळ मोलाचा ठरेल. या काळात थोडी आर्थिक चणचण जाणवू शकते. पण प्रयत्न केल्यास यश येईल. प्रवास सध्या टाळलेला बरा कारण त्यातून नुकसान संभवते. लहान भावंडांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा संवाद साधत असताना सावध राहावे.
उपाय पाच पिवळय़ा कवडय़ा जवळ ठेवाव्या
कुंभ
तब्येतीच्या तक्रारीमुळे दुर्लक्ष करू नका. योग्य ती काळजी घ्या. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश प्राप्ती होईल. भावंडांचे सुख मिळेल. ऐनवेळी शेजाऱयांकडून मदत प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जमिनीच्या व्यवहारांना सध्याला टाळलेले बरे. आई विषयी काळजी वाटू शकते. गुंतवणुकीतून लाभ प्राप्त होईल. प्रेमसंबंध मधुर होतील. गुप्त शत्रूंच्या कारवायांना आळा बसेल. नोकरीत सावध रहा.
उपाय छाया दान करा
मीन
आपल्या हाताने आपले आरोग्य बिघडवून घेऊ नका, कुपथ्य करणे किंवा लहान मोठय़ा आजाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आर्थिक प्राप्ती चांगली असेल. कुटुंबातील व्यक्ती मदत करतील. कुटुंबात एखाद्या फंक्शनविषयी चर्चा कराल. प्रवासातून नुकसान संभवते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. वैवाहिक जीवनात ताणतणाव अनुभवायला येऊ शकतो. वाहन जपून चालवा.
उपाय सव्वाशे ग्रॅम बदाम वाहत्या पाण्यात सोडा.





