बुधवार दि. 3 ते मंगळवार दि. 9 फेब्रुवारी 2021
वेळेपेक्षा आधी व नशीबापेक्षा जास्त मिळणे कठीण!
एखाद्याचा धंदा व्यवसाय जोरात चाललेला पाहून काही जणांना मत्सर आणि हेवा वाटू लागतो. दोघांचाही व्यवसाय तोच आहे पण, त्याला जास्त आणि मला कमी का? असा प्रश्न ते स्वतःलाच विचारत असतात. .प्रत्येक जण स्वतःच्या नशिबाचा भागिदार असतो. कुणी जळतंय अथवा हेवा करते म्हणून त्याचं नशीब कमी होत नाही. ‘स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यं’ अशी एक म्हण आहे. स्त्रीचे चरित्र कधी बिघडेल आणि पुरुषांचा भाग्योदय कधी होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. त्याच न्यायाने ‘वक्त से पहले और तकदीर से ज्यादा कुछ नही मिलता’ ही म्हणही प्रसिद्ध आहे. तुम्ही प्रयत्न करा अथवा न करा नशिबात जे मिळायच ते मिळणारच पण, नशिबातच नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा यश मिळणार नाही. परमेश्वर किंवा नियती कोणावरही अन्याय करीत नाही. ज्याच्या त्याच्या पाप-पुण्यानुसार अथवा प्रारब्धानुसार बरे-वाईट फळ त्याला मिळत असते. त्यासाठीच भगवद्गीतेत ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ असे एक वचन आहे. ‘तू कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नको’ असे श्रीकृष्णाने सांगितलेले आहे. नियतीने दोन चाव्या केलेल्या आहेत. त्यापैकी कर्माची चावी आपल्याकडे असते तर दुसरी चावी नियतीकडे असते. आपण एखादे कर्म केले म्हणजे त्याचे फळ मिळतेच असे नाही. पूर्वजन्मातील तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब पाहून त्यानुसार माणसाला फळ मिळत असते. एक वेळ परमेश्वर माफ करील, पण कर्म कधीही माफ करीत नाही. आज ना उद्या त्याचे बरे-वाईट फळ हे भोगावे लागते. निसर्गाचा एक नियम आहे. एक बी पेरल्यावर झाड उगवते व असंख्य फळे देऊ लागते, तसेच कर्माचेही आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण जे काही चांगले कर्म करतो, कुणाला खाऊ घालतो, मुक्मया प्राण्यांना खाऊ घालून त्याचे आशीर्वाद घेतो, कुणालातरी नोकरी लावून देतो, एखाद्या गरीब मुलीचे लग्न करून दिले जाते, जे जे चांगले कर्म केले जाते त्याचे चांगले परिणाम प्रचंड स्वरूपात आपल्याकडे नियती परत पाठवीत असते. त्याच न्यायाने जर कर्म वाईट असेल तर त्याचे अनिष्ट परिणामही महाप्रचंड वेगाने नियती आपल्याकडे पाठवीत असते. अनिष्ट कर्माची व्याप्ती जर मोठी असेल तर शेवटच्या क्षणी तोंडात पाणी घालायलाही कुणी राहत नाही. नातेवाईकांचा प्रचंड गोतावळा व अफाट संपत्ती असूनही बेवारस मृत्यू येतो. यासाठीच आपले कर्म स्वच्छ कसे राहील याकडे लक्ष द्यावे लागते. काहीजणांच्याकडे प्रचंड पैसा, जमिनी, शेतीउद्योग असतात पण, त्याच्या जोरावर ते कुणालाही काही वाईट बोलत असतात. अशा लोकांचा अंतिम काळ फार वाईट असतो व या जन्मी अथवा पुढील जन्मात कर्माचे फळ भोगावे लागते. त्यातून कुणाचीही सुटका नाही. या जन्मात नाही तरी पुढील जन्मात तरी ते भोगावेच लागते. वारसाहक्कानुसार पुढील पिढय़ांनाही ते भोगावे लागते. आपले कर्म चांगले असेल, हातून लोकांचे सतत कल्याण होत असेल तर तुमचे भले कर असेच परमेश्वराला सांगावे लागत नाही. जो दुसऱयांच्या चेहऱयावर हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या चेहऱयावरील हास्य व आनंद कधीच कमी होत नाही.
मेष
महत्त्वाचे सहा ग्रह दशमात आहेत. अशा योगावर जीवनात अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडतात. नोकरी-व्यवसायात सुधारणा, धंदा बंद पडणे किंवा कुटुंबातील वयस्कर लोकांच्या आरोग्यास धोका, काहीतरी गडबड गोंधळ होऊन नोकरी सुटणे यासह बाऱयाच चमत्कारी घटनांचा अनुभव येईल. तेथेच वक्री आलेला बुध एखादे उच्चपद देखील देऊन जाईल. राजकीय वक्तृत्व चांगले असेल तर फार मोठे यश मिळेल. व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल, पण महत्त्वाच्या कामात खोटी कागदपत्रे, विश्वासघात वगैरेचीही शक्मयता आहे. सावध राहणे आवश्यक.
वृषभ
भाग्यस्थानी सहा ग्रहांची होणारी युती अतिशय महत्त्वाची मानली जाते. भाग्योदय, भरभराट, सासरच्या कुटुंबात काहीतरी गडबड गोंधळ होणे, जत्रा-यात्रा अशा ठिकाणी किमती वस्तू किंवा एखादी व्यक्ती हरवणे अशा घटना घडू शकतात. त्याच ठिकाणी वक्री आलेल्या बुधामुळे उच्चशिक्षणाची हौस पूर्ण होईल. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. काहीजणांना व्यापार, व्यवसाय त्यात मोठे यश. काही कारणाने पिता, पुत्रात खडाजंगी होईल. त्यातून फाटाफूट आणि इस्टेटीच्या वाटण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
मिथुन
अत्यंत महत्त्वाचे सहा ग्रह अष्टमात आहेत. हा योग चांगला नसतो. वादावादी, मतभेद, संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. प्रवासात अपघात. आजुबाजूच्या लोकांपासून सावध राहणे. तसेच कितीही गंभीर प्रसंग आला तरी मनाची शांतता ढळू न देणे, यांचा अंगीकार करा. राशीस्वामी बुध वक्री अवस्थेत अष्टमात येत आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही किरकोळ दुखणीदेखील गंभीर स्वरूप धारण करू शकतील. महामृत्युंजय मंत्र व कुलदेवतेची आराधना चालू ठेवा. त्यामुळे संकटातून निश्चितच सुटका होईल.
कर्क
अत्यंत महत्त्वाचे सहा ग्रह सप्तम स्थानात आहेत. हा योग अत्यंत विचित्र असतो. भागिदारी व्यवसाय, प्रवास, उगडशत्रू, कोर्ट प्रकरणे, कर्ज प्रकरणे इत्यादी बाबतीत सावध राहावे लागेल. अशा योगावर काहीवेळा अत्यंत चांगल्या घटना घडतात. कल्पना नसताना मोठी लाभदायक घटना घडते. एखाद्या व्यक्तीमुळे अचानक लग्न ठरुन जाते पण, तरीही बेफिकीर राहू नका. गंभीर परिणाम घडू शकतो. या षडग्रहांचा अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी पश्चिमेकडील प्रवास शक्मयतो टाळा. तसेच कुलदेवतेची आराधना चालू ठेवा.
सिंह
राशीच्या मृत्यू षडाष्टकात सहा ग्रह एकत्र आहेत. हा अत्यंत धोकादायक योग आहे. कोणत्याही प्रकारचे धाडस करू नका. वादावादी, भांडणं, अपघात, दुर्घटना, शस्त्रक्रिया यापासून जपा. निष्कारण शत्रुत्व उद्भवणार नाही याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कोर्ट प्रकरणे, भाऊबंदकी वगैरे प्रकार असतील तर ते पुढे ढकलणे योग्य ठरेल, पण नोकरी व्यवसायात मात्र उत्तम प्रगती झालेली दिसून येईल. अचानक मोठय़ा प्रमाणात पैसाही मिळेल. काही अनपेक्षित गोष्टी साध्य होतील.
कन्या
पत्रिकेतील पंचम स्थान अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी सहा ग्रहांचे आगमन तुमच्या जीवनाला अत्यंत महत्त्वाची कलाटणी देणार आहे. आध्यात्मिक व धार्मिक असाल तर दृष्टांत, साक्षात्कार वगैरे प्रकार घडू शकतात. शिक्षणात अचानक मोठे यश मिळू शकते पण, वैवाहिक कार्यात अडथळे, प्रेमप्रकरण, फसगत, विश्वासाने दिलेली रक्कम अडकणे, गैरसमजामुळे होऊ घातलेली कामे रखडणे, असे प्रकारही घडू शकतात. महिलावर्गाने सर्वबाबतीत सावध राहणं आवश्यक आहे. वक्रगतीने पंचमात आलेला बुध शिक्षणात उत्तम यश देईल. संततीविषयक काही इच्छा पूर्ण होतील. शेअर बाजार व तत्सम क्षेत्रात अनुभव नसेल तर चुकूनही गुंतवणुक करू नका.
तूळ
रामायण, महाभारत घडविणारी महत्त्वाच्या सहा ग्रहांची युती सुखस्थानी होत आहे. अजून काही बाबतीत अतिशय चांगला तर इतर बाबतीत धोकादायक ठरू शकतो. घराची दुरुस्ती, रिपेरी वगैरे करताना अपघात होऊ शकतात. वाहनाशी केलेली मस्ती अंगलट येऊ शकते. चांगल्या भावनेने एखाद्याला केलेली मदत विपरीत परिणाम घडवू शकते. वास्तुविषयक कोणतेही काम अत्यंत जपून करावे. गंजलेल्या आणि टोकदारवस्तू पासून जपून रहा. आणि गाडीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे इतरांच्या हाती पडणार नाहीत याची काळजी घ्या. ज्यांचा काहीही संबंध नाही अशा व्यक्तीला घरात घेऊ नका अथवा त्यांच्याशी फारसा संपर्कही ठेवू. नका.
वृश्चिक.
प्रवास, संपर्क, लिखाण या स्थानी महत्त्वाचे सहा ग्रह आहेत. कोणतेही प्रवास अत्यंत जपून करावेत. पत्रव्यवहार, आजूबाजूचे संपर्क, नातेवाईकांशी बोलणे, वागणे यासह जिथे जिथे संपर्क आहे तेथेच जपून राहा. सहज एखादा चुकीचा शब्द गेल्यास त्याचे मोठे राजकारण केले जाऊ शकते, अथवा मोबाईल संपर्कातून नको ते प्रकार घडू शकतात. असा योग कित्येक वर्षातून क्वचितच येतो. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहून काम करणे योग्य ठरते. साहित्यिक, पत्रकार, प्रवासी संघटना, ड्रायव्हिंग क्षेत्र व संपर्क माध्यमे यांच्याशी संबंध असेल तर फार मोठे यश मिळेल. बुधाचे आगमन सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनुकूल आहे.
धनु
अत्यंत महत्त्वाच्या धनस्थानी महत्त्वाची सहा ग्रहांची युती होत आहे. आर्थिक बाबतीत हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ध्यानीमनी नसता अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही दुर्घटना घडून अचानक मोठी आर्थिक हानी देखील होऊ शकते. त्यासाठी कोणत्याही आर्थिक व्यवहारात आपण सावध राहावे. नोकरी वगैरे सोडण्याचा विचार करू नका, तसेच स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यात काहीही बदल करू नका. विद्यार्थ्यांनी शेवटचे वर्ष असेल तर नोकरीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. विवाहाच्या वाटाघाटी करताना आर्थिक बाबीवरून कडाक्याचे वाद होऊ शकतात. शक्मयतो मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत.
मकर
चंद्रासह सात महत्त्वाचे ग्रह तुमच्या राशीत आहेत, हा एक प्रकारचा जागतिक अत्यंत महत्त्वाचा योग आहे. कल्पनाही केली नसेल असे मोठे यश मिळू शकते. प्रचंड प्रमाणात पैसा येऊ शकतो. घरदार, बंगला, वाहन, कोर्ट प्रकरणात यश, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणे, भगीरथ प्रयत्न करूनही न झालेली कामे कुठे तरी कुणाच्यातरी सहाय्याने अचानक पूर्ण होणे असे चांगले अनुभव येतील. पण त्याच बरोबर आरोग्य बिघडणे, कडाक्याचे वाद-विवाद, गैरसमज, वाहन अपघात, मध्यस्थी किंवा जामिनकी अंगलट येणे, दुरूस्ती वगैरे करताना अपघात असे प्रकार हे करू शकतात. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावी लागतील.
कुंभ
अनिष्ट स्थानी सहा ग्रहांची युती होणे चांगली नसते. फक्त अध्यात्मिक क्षेत्रातील अनुभव चांगले येतील, परदेश प्रवासाचे योग नव्या आर्थिक संधी तसेच नोकरी-व्यवसायात बदल होण्याचे योग असे चांगले अनुभव येतील. त्याचबरोबर किरकोळ कारणावरून मतभेद, संघर्ष, गैरसमज, साध्यासुध्या कामासाठी मोठा खर्च असे प्रकारही घडतील. कोणताही ग्रह कधीही वाईट नसतो पण, ज्यावेळी परस्पर विरोधी शत्रू ग्रहांच्या सानिध्यात अनिष्टस्थानी हे ग्रह येतात, त्यावेळी त्यांचा प्रभाव वाढतो व ते बरी किंवा वाईट फळे प्रकर्षाने देतात. त्यासाठी सावधानता व प्रसंगावधान महत्वाचे ठरते. नवग्रहस्तोत्र वाचन चालू ठेवा. म्हणजे अनिष्ट ग्रहामुळे येणारी संकटे परस्पर निघून जातील.
मीन
आकाशातील वीज एकदाच चमकुन जाते. रामसेतु एकदाच बांधला जातो. तसेच पूर्वीच्या काळी शंकराचार्यांच्या तपस्येच्या प्रभावाने एका गरीब ब्राह्मणाला लक्ष्मी प्रसन्न झालेली दिसते. अशा गोष्टी वारंवार घडत नसतात. सध्या लाभातील सहा ग्रहांची युती अत्यंत महत्त्वाची असल्याने फार मोठे यश देणारी आहे. कल्पनाही केली नसेल असे ऐश्वर्य मिळू शकते. साधीसुधी व्यक्ती देखील श्रीमंत व ऐषारामात लोळू शकते. तसेच केलेल्या कष्टचे उत्तम फळ मिळते जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक व योग्य दिशेने असतील तर. सध्याचे ग्रहमान तुम्हाला सर्व बाबतीत मोठे यश देऊ शकते, पण त्याचबरोबर सावधानता बाळगणे आवश्यक आहे. किरकोळ चुका देखील मोठे नुकसान करू शकतात.





