बुधवार दि.2 डिसेंबर ते मंगळवार दि.8 डिसेंबर 2020
सर्वात जास्त भाग्यवान कोण….?
सर्वात जास्त भाग्यवान कुंडली कशी ओळखावी, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. एखाद्याचा हातगुण किंवा पायगुण चांगला किंवा वाईट असे आपण म्हणतो त्यामागे काय रहस्य असेल किंवा त्याचे कारण काय असावे? जिथे प्रश्न आहे तेथे उत्तर हे असणारच. जगात कुठे ना कुठे हजारो मुले जन्माला येत असतात. रास तीच, वेळ तीच, ग्रहमान तेच, पण असे असूनही सर्वांच्याच कुंडलीत राजयोग नसतो किंवा सर्वांचाच हातगुण अथवा पायगुण चांगला नसतो असे का व्हावे असेही अनेक जण विचारत असतात, पण ज्योतिषशास्त्राचा खरोखरच ज्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला असेल, तसेच देवधर्म व्यवस्थित सुरू असेल तर अशा गोष्टीचे उत्तर सहज मिळू शकते. एखादी व्यक्ती अत्यंत श्रीमंत, विमानाने फिरणारी, व बुद्धिमान असेल पण तिचा हातगुण चांगला असेलच असे नसते तर काही वेळा अत्यंत साधी व्यक्ती जिचे शिक्षण नसेल, खायला अन्न नसेल तरीही तिचा हातगुण काही लोकांना फार छान लाभतो असेही दिसून येते. उदाहरणार्थ सहज आपण कुणाला काहीतरी देतो आणि तो सहज आशीर्वाद देऊन जातो पण त्या आशीर्वादात इतके सामर्थ्य असते की, साधा माणूस देखील लक्षाधीश, कोटय़ाधीश होऊ शकतो. तर काही वेळेला ह्याच्या उलटही घडू शकते. पूर्वजन्मातील बरे-वाईट कर्म यांचाही यात संबंध असतोच, पण पूर्वजन्मात नक्की काय घडले आहे हे मात्र कुणालाही सांगता येत नाही. पत्रिकेवरून ह्या गोष्टी सहज समजू शकतात. एखाद्याची पत्रिका पाहिल्यावर तुमच्या कुटुंबात असे दोष आहेत, अमुक शांती केली पाहिजे असे आपण सांगतो, पण ते नक्की दोष कोणते? काय घडले असेल व कोणत्या वषी ? व त्याचे कारण काय असावे व त्याचा योग्य परिहार काय? हे मात्र कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच अत्यंत महागडय़ा शांती करून देखील त्याचा गुण येत नाही. कारण ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा हा प्रकार असतो. जोपर्यंत रोगाचे योग्य निदान होत नाही, तोपर्यंत केलेली औषधयोजना लागू पडत नाही. त्यासाठीच पत्रिका पाहताना या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून मगच निर्णय घ्यावा लागतो. एखादी व्यक्ती सुंदर, प्रचंड पैसा असतो, नावलौकिक, पैसाअडका, सोन्यासारखी देखणी मुले वगैरे सर्व काही असते, पण अचानक काही दुर्घटना घडून सर्व काही जाते असे का व्हावे? कोणते दोष यांना नडतात? याचा शास्त्रीय अभ्यास केला जात नाही. त्यामुळे पत्रिकेतील ग्रहमान व्यवस्थित अभ्यासता आल्यास यातून बऱयाच गोष्टी सहज समजू शकतात. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना आतापर्यंत न आढळलेली गुप्त गोष्ट अध्यात्मशक्तीतून नजरेस आलेली आहे. ज्यावेळी त्याचा अभ्यास केला त्या वेळी त्यात बरेच तथ्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार पाहिल्यास आपले जीवन सुखी होणार की, दु:खी हे समजू शकते. ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना प्रथम स्वतःची कुंडली पहावी लागते. ते नियम कितपत लागू पडतात तेही समजते, पण बहुतेकजण स्वतःची कुंडली स्वतः पाहत नाहीत कारण काही त्रासदायक घटना आढळल्यास त्या सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यामुळेच इतरांच्या कुंडल्या पाहून सांगितलेले, आडाखे चुकतात. अपघात झाला किंवा अचानक दुर्घटना घडून काहीजण गेले तर लोक याला स्वतःचे भविष्य समजले नसेल का? लोकांचे सांगता पण स्वतःची ग्रहगती कधी पाहिली आहे का? अशी चेष्टा करतात…….. पहिला भाग
मेष
या आठवडय़ात शुक्रवारी गुरुचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक बाबतीत चालू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. भागिदारी व्यवसाय जोरात चालेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. अष्टमात रवि-बुध-केतू असल्याने नोकरी-व्यवसायाच्या काही संधी दीर्घकाळ लांबण्याची शक्मयता आहे. कोणत्याही अनधिकृत व अनैतिक कृत्यात गुंतू नका. तसेच कुटुंबातील महत्त्वाच्या गोष्टी बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्या. इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. गुरू-शनी युतिचा फार मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी काही जणांचे जीवनच बदलून जाईल.
वृषभ
राशीस्वामी शुक्र उच्च असल्याने कोणत्याही अवघड कामात आणि विषयात चांगले यश मिळेल. मंत्र-तंत्र व गुरुविद्या शिकण्याची इच्छा असेल तर त्यात उत्तम यश मिळेल. सप्तमातील रवि-बुध-केतू हा योग चांगला नाही. वैवाहिक जीवनात काहीतरी खळबळ माजू शकते. त्यासाठी कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे आणि निर्मळ राहील याकडे लक्ष द्या. गरज नसेल तर सार्वजनिक क्षेत्रात भाग घेऊ नका. राजकारणातील व्यक्तींनी जरा जपून राहणे आवश्यक. व्यवसायिकांनी व्यवसाय वाढवण्यास प्रयत्न करावा मोठे यश मिळेल.
मिथुन
चंद्र-शुक्राचा नवपंचम योग देवीकृपा, मंगलदायी वातावरण, सर्व कामात यश, मानसिक समाधान तसेच आर्थिक लाभ घडवील. शिक्षणातील अडचणी कमी होतील. संतती इच्छुकांना अपेक्षित बातमी समजेल. पती-पत्नीतील प्रेम वृध्दिंगत होईल. काही कारणाने जर कुठे रक्कम अडकली असेल तर ती परत मिळू शकेल. व्यवसायात उत्तम प्रगती झालेली दिसेल. कौटुंबिक जीवनात समाधान राहील, पण रवि-बुध-केतू योग आरोग्याच्या काही समस्या निर्माण करील. त्यासाठी बेफिकीर राहू नका. किरकोळ चुका देखील उग्र स्वरूप धारण करू शकतील. वाहन जपून चालवा.
कर्क
चतुर्थातील शुक्र म्हणजे आनंदी वातावरण, वास्तूचे स्वप्न साकार होणे, कुटुंबात शुभ घटना, किमती वस्तूंची खरेदी, तसेच आवडत्या व्यक्तींची भेट असे शुभ फळ मिळेल. जर तुमच्याकडे नियमितपणा आणि शिस्त असेल तर फार मोठे यश मिळवू शकाल. त्याचबरोबर पंचमातील रवि-बुध-केतूच्या अशुभ योगाकडे दुर्लक्ष करू नका. मुलाबाळांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. थट्टामस्करी, मतभेद, वादावादी, खेळ तसेच वाहनाचा दुरुपयोग अशा गोष्टांrमुळे मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. तरुण-तरुणींनी नको त्या आणाभाका घेऊ नयेत. पुढे अडचणीत याल.
सिंह
उच्च शुक्राचे भ्रमण प्रवास, पत्रव्यवहार, नातेवाईक व मित्रमंडळ संबंध सुधारणे, धनलाभ, नव्या उत्पन्नाचे मार्ग दिसणे, मंगलकार्य, संचार परिवहन इत्यादी क्षेत्रात मोठी झेप घेण्यास मदत करील. सर्व कामे हातावेगळी करू शकाल. कामाचा उत्साह वाढेल. चतुर्थातील रवि-बुध-केतू हा योग चांगला नाही. काहीतरी करायचं म्हणून ठरवाल पण घडेल वेगळेच, त्यामुळे मनस्ताप होईल. तुमची बाजू कितीही बरोबर असली तरी समोरची व्यक्ती ते मान्य करेलच असे नाही. आगामी दोन-तीन महिन्यांचा कालखंड जरा त्रासदायक आहे. काळजी घ्या.
कन्या
धनस्थानी उच्च शुक्र म्हणजे लक्ष्मीची कृपा म्हणता येईल. कोणतेही काम करा, त्यात बऱयापैकी पैसा मिळेल. नोकरीत भरती अथवा बढतीसाठी प्रयत्न चालू असतील तर त्यात यश मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दैवीकृपेने आर्थिक सहाय्य मिळेल. मानसिक समाधान देणारा कालखंड आहे. तृतीय स्थानातील रवि -बुध-केतू हा योग आजूबाजूचे लोक, नातेवाईक व आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती यांच्याशी किरकोळ कारणावरून संघर्ष निर्माण करील. त्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे. कुणाशीही बोलताना जेवढय़ास तेवढे बोला. व्यवहारी बाबतीत आपण हुशार आहातच, पण आपल्यापेक्षाही चाणाक्ष लोक या जगात असतात, याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही.
तूळ
राशी स्वामी शुक्र तोही उच्च अवस्थेत आहे. त्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. आर्थिक भरभराट होईल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. जेथे जाल तेथे तुमची प्रशंसा होईल. विवाहाच्या प्रयत्नात असाल आणि जोडीदाराला जर गुरुबळ असेल तर विवाह होऊ शकेल. धनस्थानात रवि-बुध-केतू हा योग चांगला नाही. आर्थिक बाबतीत आपणास सावध राहावे लागेल. देणे-घेणे जपून करा. निष्कारण कोणाशीही शत्रुत्व घेवू नका. तसेच कुणालाही जामीन वगैरे राहू नका. एखाद्याच्या सांगण्यावरून कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारात सहभागी होऊ नका.
वृश्चिक
तुमच्या राशीतच रवि-बुध-केतू आहे. अशा योगावर काहीवेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे पुढील कामकाजावर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना चार-पाच वेळा विचार करून सलामसलत करून मगच अंतिम निर्णय घ्या. उच्च शुक्र अचानक मोठे धनलाभ करून देईल. तुमच्या कुंडलीत परदेश प्रवासाचे योग असतील तर हा महिना तुम्हाला अतिशय भाग्यवान ठरणार आहे. काहीजणांना परदेशी नोकरीचे कॉलही येतील, तर इतरांना स्वतंत्र नोकरी करण्याची संधी मिळेल. मंगलकार्याच्या दृष्टीने हा शुक्र उत्तम आहे. त्यामुळे केलेले कोणतेही धार्मिककार्य चांगले फळ देऊन जाईल. विद्यार्थांनी अवांतर विषयांकडे लक्ष देऊ नये.
धनु
लाभातील शुक्र म्हणजे धनलाभ. वाहनयोग, स्वतःची वास्तु होणे, चांगले मित्र -मैत्रिणी भेटणे आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळणे असा अर्थ आहे. त्यामुळे या शुक्राच्या कालखंडात तुम्हाला सर्वतऱहेने लाभ होणार आहेत, पण अनिष्ट स्थानी असलेल्या रवि-बुध-केतूमुळे काही गंभीर समस्या निर्माण होतील. त्यातील काही सरकारशी संबंधित असतील. पूर्वी जर एखादी चूक झाली असेल तर कुणीतरी त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी आपण सावध राहावे. शनि -गुरुचा सहयोग मोठय़ा कामात यश देईल. कुटुंबात जर एखादी व्यक्ती हरवली असेल अथवा दूर गेली असेल तर तिची पुन्हा गाठ भेट होऊ शकते. काही जणांना गेलेली नोकरी परत मिळण्याची ही शक्मयता आहे.
मकर
दशमातील राजयोगाचा शुक्र म्हणजे जीवनात चैतन्य, आनंद, समाधान, मानसन्मान व प्रति÷sत वाढ अशी फळे मिळतात. नोकरीतील काही त्रास कमी होतील. आवडत्या जागी काम करण्याची संधी मिळेल. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर नक्की यश मिळेल. रवि-बुध-केतूचा योग काहीतरी गडबड गोंधळ करील. त्यासाठी आपले बँक बॅलन्स, पिन नंबर अथवा इतर महत्त्वाचे नंबर वगैरे शक्मयतो कोणालाही सांगू नका. कोणीही त्याचा गैरवापर करू शकतील. विशेषतः एखाद्या मित्र-मैत्रिणीने थोडय़ावेळासाठीही मोबाईल मागितला तर त्याचा काय उपयोग होतो याकडे बारकाईने लक्ष ठेवा. त्यांची एखादी चूक तुम्हाला मोठय़ा संकटात पाडू शकते. भगीरथ प्रयत्न करूनही न होणारी एखादे काम या आठवडय़ात होईल.
कुंभ
भाग्यस्थानी उच्च शुक्र म्हणजे दैवी कृपा म्हणता येईल. देवीची आराधना असेल तर काही सुचक दृष्टांत होतील व ते पुढील जीवनात अत्यंत उपयोगी ठरतील. महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचणी पडणार नाहीत. ऐनवेळी कुणीतरी देवासारखे उभे राहून मदत करतील. दशमातील रवि-बुध-शुक्र हा योग नोकरी-व्यवसायात काही नको ते प्रसंग निर्माण करील. शक्मयतो कुणाचेही मन न दुखविता काम करून घ्या. मालकवर्गाची मर्जी सांभाळावी लागेल. एखादवेळेस इतरांची कामेही तुम्हाला करावे लागतील. या आठवडय़ात महत्त्वाची कागदपत्रे आणि वाहन कुणालाही देणे धोकादायक ठरेल.
मीन
अष्टमात उच्च शुक्र म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे लक्षण म्हणता येईल. अचानक मोठे धनलाभ, जमीन आणि वास्तु तसेच जिवावरच्या प्रसंगातून सुटका होणे असे अनुभव येतील. आलेले पैसे राखून ठेवण्यास हा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील स्त्रियांची मने सांभाळल्यास व त्यांना आनंदी ठेवल्यास या शुक्राचे अतिशय चांगले फळ मिळणार आहे. भाग्यातील रवि-बुध-केतू योग प्रवासात अडचणी दर्शवितो. त्यामुळे जरा काळजी घ्या. अतिवेगाचा उत्साह जिवावर बेतू शकेल. घरातील एखाद्या पाळीव प्राण्यांमुळे गंभीर संकटातून वाचाल अथवा त्यांच्यामुळे कुठून तरी पैसाही मिळू शकेल.





