बुधवार दि.10 ते मंगळवार दि.16 फेब्रुवारी 2021
गैरसमज हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू
काहीजण सतत एखाद्याच्या मागून टीकाटिपणी, कुत्सित टोमणे मारणे, मर्मभेदी चिकित्सा करणे, गैरसमज करून घेणे, एखाद्याविषयी भलतेसलते बोलणे असे प्रकार करीत असलेले दिसतात. यावर उपाय काय? असे अनेकांनी विचारले आहे. जो माणूस खरा असतो तो समोर बोलण्यास घाबरत नाही, पण ज्याच्या मनात काळेबेरे असते अशीच माणसे मागून बोलत असतात. टीका करणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्याला इलाज नाही. इतरांना आपण बदलू शकत नाही. स्वतः सुधारणे हे महत्त्वाचे. पण निष्कारण एखाद्याविषयी गैरसमज निर्माण करून घेणे, हा तर महाभयंकर प्रकार आहे. एक माणूस जर स्वतःच्या कष्टाने प्रगती करून घेत असेल तर त्याच्यामागून निंदानालस्ती सुरू होते. चांगल्या कामाचे कोणी कौतुक करत नाहीत पण एखादी किरकोळ चूक सापडल्यास त्याचे भांडवल केले जाते व मुक्मयाला देखील वाचा फुटते असे म्हणतात. पण एखाद्याचे चांगले गुण घ्यावेत, त्याची प्रशंसा करावी, कौतुक करावे, त्याला प्रोत्साहन द्यावे असे कुणालाच कधीही वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांची प्रगती होत नाही. वाणीवर सरस्वतीचा अंमल असतो. त्यामुळे आपली वाणी जितकी शुद्ध, स्वच्छ व पवित्र राहील, त्या प्रमाणात आपली प्रगती होत जाते. याउलट जर कोणाची त्याच्यामागून निष्कारण निंदानालस्ती करणे, त्याला वाटेल तसे बोलणे, टीका करणे असे प्रकार सुरू केल्यास सरस्वतीचा कोप होतो. अशा लोकांची कधीही प्रगती होत नाही. कारण स्वतःच्या वाणीचा त्यांनी गैरवापर केलेला असतो. त्यामुळे सरस्वती व लक्ष्मी दोन्ही कोपल्या जातात व ऐनवेळी त्याचे फटके बसतात. त्यासाठी तुमची भाषा, धर्म अथवा जात कोणतीही असो आपली वाणी पवित्र व स्वच्छ राहील याकडे लक्ष द्या. काहीजणांना मागे बोलण्याची सवय असते, तो त्यांचा स्वभाव असतो, तो आपण बदलू शकत नाही. भूमी ही सतत तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपण जो काही चांगला-वाईट विचार करतो, त्याचे प्रतिसाद कुठे ना कुठे उमटतात आणि वेळ येताच त्याचे परिणाम दिसू लागतात. ज्या कुणाला खरोखरच आपली प्रगती करून घ्यायची असेल, त्यांनी आपली वाणी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. वाणी जर खराब असेल तर तुमच्याकडे कितीही बुद्धिमत्ता असली तरी तुमची प्रगती होणार नाही. ज्या तोंडाने आपण देवाचे नाव घेतो, मंत्र वगैरे म्हणतो, त्याच तोंडाने जर अपशब्द उच्चारले गेले तर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. एखादी व्यक्ती आपल्या वाईटावर असेल तर त्याला चांगले कसे म्हणावे असा प्रश्न पडेल. पण परमेश्वराचं सर्वत्र लक्ष असते. कोण कसा आहे, त्याचे हेतू काय आहेत, हे सर्व त्याला कळत असते. त्यामुळे दशा, महादशा, अंतरदशेनुसार त्याचे बरे-वाईट फळ त्याला मिळत असते. एखाद्याच्या विषयी त्याच्यामागून चांगले बोलून पहा, त्याची प्रशंसा करा आणि मग त्याचा अनुभव काय असतो हे सुद्धा पहा. वाणीची देवता सरस्वती प्रसन्न असेल तर जीवनात कोठेही अपयश येत नाही. लक्ष्मी तर आपण होऊन साथ देते, हे लक्षात ठेवावे. पण सरस्वती कोपली तर मात्र साऱया जीवनाचे अक्षरशः बारा वाजतात.
मेष
उद्या अमावस्या योगावर दशमात होणारी सात ग्रहांची युती अत्यंत महत्त्वाची व जीवनाला कलाटणी देणारी आहे. या दोन-तीन दिवसात ज्या काही घटना घडतील त्याचा परिणाम दीर्घकाळ राहील. सप्तग्रहांची ही युती असेपर्यंत कोणतेही महत्त्वाचे काम करून घ्या, पण वादावादी, नोकरीत वरि÷ांशी मतभेद व राजकारणाशी संबंध असेल तर अत्यंत जपून राहावे लागेल. एखाद्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचवणे अथवा एकदम रसातळाला येणे असे प्रकार या योगावर अनुभवास येतात. अति दूरचे प्रवास शक्मयतो टाळावेत, तसेच दुरुस्ती वगैरे कामे तूर्तास हाती घेऊ नयेत.
वृषभ
भाग्यस्थानात सात ग्रहांची युती होणे अत्यंत दुर्मीळ योग समजला जातो. पूर्वजन्माचे पुण्य जर चांगले असेल तर या दोन दिवसांत तुमचे भाग्य मोठय़ा प्रमाणात वाढलेले दिसून येईल. न होणारी लग्न जुळतील, बेकारांना चांगल्या नोकऱया मिळू शकतील, नावलौकिक, प्रसिद्धी, कलागुणांना वाव मिळणे यादृष्टीने हा योग अतिशय चांगला आहे. पण दूरवरचे प्रवास, कोर्ट वगैरे बाबतीत जरा जपून राहावे लागेल. क्षणात होत्याचे नव्हते करणारा हा योग आहे. त्यामुळे सर्व बाबतीत जपून राहा. तरुणवर्गाने कोणत्याही परिस्थितीत वाहनाशी मस्ती करू नये.
मिथुन
अष्टम स्थानात सात ग्रहांची होणारी युती ही चांगली म्हणता येणार नाही. फक्त आर्थिक बाबतीत हा योग अतिशय उत्तम आहे. आचानक धनलाभ, महत्त्वाची मोठी कामे होणे, अडकलेले पैसे मिळणे, किमती वस्तूंची खरेदी या दृष्टीने चांगले अनुभव येतील. पण गंभीर वाहन अपघात, मोठय़ा शस्त्रक्रिया, जिवावरचे प्रसंग व गैरसमज, अफाट खर्च या बाबीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. जितके सावध राहाल, तितके उत्तम ठरेल. वाहन जपून चालवा.
कर्क
महत्त्वाच्या सप्तमस्थानात सात ग्रहांची होणारी युती काही बाबतीत अतिशय शुभ, फलदायक, जीवनाला कलाटणी देणारी व संधीचे सोने करणारी आहे. मूळ पत्रिकेत जर सप्तम स्थान बलवान असेल तर प्रचंड प्रमाणात पैसा, संपत्ती व इस्टेट मिळू शकते पण, त्याचबरोबर वैवाहिक जीवनात घोटाळे, किरकोळ कारणांवरून कडाक्मयाचे वाद, मानहानी, संशयी वातावरण त्यामुळे नको त्या थरापर्यंत प्रसंग जाणे, कोर्ट प्रकरणात उलट-सुलट निकाल लागणे, प्रवासात अपघात अशा घटनांचीही रेलचेल दिसून येईल. या दोन-तीन दिवसात सर्व तऱहेने काळजी घ्या.
सिंह
राशीच्या सहाव्या स्थानात होणारी सात ग्रहांची युती तुमच्या जीवनात ‘न भूतो न भविष्यती’ असे महत्त्वाचे बदल अथवा स्थित्यंतरे घडवील. जर सहावे स्थान मुळातच चांगले असेल तर नोकरी, व्यवसाय, आर्थिक भरभराट, शत्रुनाश अशी चांगली फळे मिळू शकतील. पण तुमच्या राशीच्या मृत्यूषडाष्टकात हा योग होत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. सर्व वाहन अपघात व दुर्घटनेपासून जपा. कोणत्याही योजनेत मोठी गुंतवणूक करताना जपावे लागेल. अमावस्येच्या आसपास दोन-तीन दिवस सर्व बाबतीत जपून राहा.
कन्या
पंचम स्थान हे अतिशय महत्त्वाचे स्थान. अमावस्या दरम्यान सात ग्रहांची युती या स्थानी होत आहे. दैवीकृपा होणे, मुलाबाळांचा भाग्योदय, अचानक मोठे धनलाभ, शिक्षणाची हौस पूर्ण होणे, नावलौकिक, शुभघटना या योगावर घडू शकतात. पण त्याचबरोबर अनपेक्षितरित्या नको त्या घटना, पाय घसरून पडणे, गंभीर अपघात, किरकोळ प्रकरणे नको त्या थरापर्यंत जाणे, अचानक आर्थिक फटका, कुणाच्यातरी चुकीचा परिणाम भोगावा लागणे, दैवीकार्यात, मंगलकार्यात घोटाळे होणे. मुलाबाळांचे चुका निस्तराव्या लागणे, प्रेम प्रकरणात फसगत, त्यामुळे मानहानी असे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे दोन-तीन दिवस सर्व बाबतीत जपून राहणे आवश्यक.
तूळ
कुंडलीतील चतुर्थ स्थान अत्यंत महत्त्वाचे स्थान. या ठिकाणी अमावस्या दरम्यान सात ग्रह एकत्रित आहे. अशा योगावर ‘न भूतो न भविष्यती’ असे प्रकार घडतात. स्वतःची वास्तू होणे, वाहन लाभ, घरादाराची हौस पूर्ण होणे, आर्थिक भरभराट, नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या सुधारणा करणे असे चांगले अनुभव येतात. पण हे सात ग्रह एकत्र येतात तेव्हा काही वेळा महाभारतही घडू शकते. वाहन व वास्तू अपघात, दुर्घटना, टोकाचे मतभेद, कौटुंबिक जीवनात उलथापालथ, साध्यासुध्या गोष्टींचे पर्यवसान मोठय़ा गंभीर घटनेत होणे असे प्रकार घडू शकतात. त्यासाठी सावधानता बाळगावी. उंचावर चढणे, उतरणे कटाक्षाने टाळा.
वृश्चिक
तृतीय स्थानात सात ग्रहांची युती होत आहे. कर्तबगारीला प्रोत्साहन देणारे ग्रहमान. आतापर्यंत जे साध्य झालेले नाही ते यशस्वी करून दाखवाल. नवीन नाती जोडली जातील. महत्त्वाच्या पत्रव्यवहारात यश मिळेल, पण त्याचबरोबर शत्रुमित्र ग्रहांची एकत्र युती ही काही वेळा विचित्र परिणामही दाखविते. त्यामुळे शेजारीपाजारी व नातेवाईक यांच्याशी वाद-विवाद करू नका. कोणताही प्रवास अत्यंत जपून करा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा. आपले वाहन अथवा किमती वस्तू इतरांच्या हाती चुकूनही देऊ नका. चेक, प्रॉमिसरी नोट, महत्त्वाची कागदपत्रे यावर सही करताना काळजी घ्यावी लागेल.
धनु
जीवनाला जगण्याचा आधार देणाऱया महत्त्वाच्या धनस्थानात सात ग्रह एकत्र येत आहेत. त्यामुळे अमावस्या दरम्यान दोन-तीन दिवस अतिशय महत्त्वाचे असतील. मोठय़ा प्रमाणात अनेक कामांची जबाबदारी पडणे, एखादे उच्चपद मिळणे, सर्व महत्त्वकांक्षा पूर्ण होणे, हाती घेतलेले कोणतेही आर्थिक काम शक्मय होणे, अशा शुभ घटना या योगावर घडू शकतात, पण त्याचबरोबर परस्परविरोधी तत्त्वाचे हे ग्रह असल्याने काहीवेळा उलट-सुलट परिणामही दर्शवितात. आर्थिक व्यवहारात घोटाळे, डोळय़ांचे आजार अथवा जखमा, चुकीच्या अथवा मुदतबाह्य औषधांपासून धोका, चेकवर आकडा लिहिताना गफलत होणे, ऑनलाईन व्यवहारात फसवणूक अशा गोष्टी घडतील. त्यामुळे प्रसंगावधानाने वागा.
मकर
तुमच्या राशीतच सात ग्रहांची युती होत आहे. अमावास्ये दरम्यानचे दोन-तीन दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात काही चांगल्या व जीवनाला कलाटणी देणाऱया महत्त्वाच्या घटना घडतील. एखादे न होणारे कामही सहज होऊन जाईल. किमती वस्तूंची खरेदी होईल. एखादा नवीन धंदा व्यवसाय सुरू होईल, पण त्याचबरोबर मानसिक संभ्रम, गोंधळ, गैरसमज, बदनामी, मोबाईलवरून फसवणूक, आर्थिक फसवणूक, आरोग्याच्या तक्रारी अशा घटना ही घडण्याची शक्मयता आहे. कोणतेही मोठे धाडस या सप्ताहात करू नका. जितके सावध राहता येईल, तितके सावध रहा.
कुंभ
मोक्षस्थानामध्ये सात ग्रह एकत्र आहेत. शिवाय सध्या साडेसातीचा प्रभावही आहे. त्यामुळे आपणास सर्व बाबतीत जपून राहावे लागेल. देवधर्म, मंगलकार्य, आरोग्यात सुधारणा, कोर्टमध्ये यश अशा काही चांगल्या घटना घडू शकतात. पण मुळातच बारावे स्थान हे शुभ मानले जात नाही. तेथे सात ग्रह असणे चांगले नसते. त्यामुळे दोन-तीन दिवस सर्व बाबतीत जपून राहा. कोणतेही धाडस, आर्थिक व्यवहार, प्रवास, देणी-घेणी, वाटाघाटी करताना जास्तीत जास्त काळजी घ्या. प्रकृती जपा. सर्व अपघात, दुर्घटनांपासून दूर राहा. स्वतःचे वाहन कोणाला देऊ नका. अथवा दुसऱयांचे वापरू नका.
मीन
महत्त्वाचे सात ग्रह लाभस्थानात असल्याने आर्थिक भरभराट होईल. कोणताही व्यवसाय जोरात चालेल. स्वतःची वास्तू, घरदार, वाहन घेणार असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकेल. आतापर्यंत आयुष्यात कधीही कल्पना केली नसेल असे मोठे यश देणारा हा योग आहे. अमावस्या दरम्यानच्या दोन-तीन दिवसात अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही बऱया-वाईट घटना घडतील, त्याचा परिणाम आगामी अनेक वर्षापर्यंत राहील. त्या घटना लिहून ठेवा. या कालखंडात होणारे लाभ हे कायमस्वरूपी टिकणारे असतील तर होणारे त्रास हे चिरंतन मनात राहतील.





