जिल्हय़ातील बाधितांची संख्या सातवर, मरकज कनेक्शनमुळे धोका वाढला
प्रतिनिधी/ बेळगाव
रायबागमधील तीन महिलांसह चौघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्वॅब तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 7 वर पोहोचली असून मरकज कनेक्शनमुळे ही संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जमातहून परतलेल्या प्रत्येकांची स्वॅब तपासणी करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी बेळगुंदी, हिरेबागेवाडी व कॅम्प येथील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा प्रशासनाने या तिन्ही भागांना निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित केले आहे. रविवारी सायंकाळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगाव जिल्हय़ातील आणखी चौघा जणांचे अहवाल पोझिटिव्ह आल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढली आहे.
बेंगळूर येथील दाम्पत्याचा समावेश
रविवारी राज्यातील आणखी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये बेंगळूर येथील दाम्पत्याचा समावेश असून 22 मार्च रोजी ते दुबईहून परतले आहेत. रायबाग येथील एक 36 वर्षीय महिला, 40 वर्षीय युवक, 67 वर्षीय वृद्धा व 41 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रायबाग येथील तीन महिला व युवक यांनी 13 ते 18 मार्चपर्यंत नवी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत भाग घेतला आहे. 20 मार्च रोजी रेल्वेने ते आपल्या गावी परतले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तपासणीसाठी येणाऱयांची संख्या वाढली
रविवारी एका दिवसात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे आयएमए हॉलमधील फ्लू कॉर्नरला तपासणीसाठी येणाऱयांची संख्या वाढली आहे. परदेशातून किंवा परराज्यातून परतलेले स्वतःहून या विभागात येऊन आपली तपासणी करून घेत आहेत. रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 70 हून अधिक जणांची या विभागात तपासणी करण्यात आली होती.
सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात कोरोनाची लागण झालेल्या सात जणांबरोबर संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांचे विलगीकरण करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे वैद्यकीय कर्मचारीही धास्तावले असून आता आपल्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न त्यांना सतावतो आहे.
संशयितांना लॉजमध्ये हलविले
25 हून अधिक संशयितांना मध्यवर्ती बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये हलविण्यात आले आहे. याबरोबरच आणखी काही जणांना इतरत्र हलविण्यात आले असून त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आणखी काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मरकज कनेक्शनच्या प्रत्येकाची होणार स्वॅब तपासणी
जिल्हा प्रशासनाने यासंबंधी रविवारी रात्रीपर्यंत पत्रकारांना कसलीच माहिती दिली नसली तरी मरकजहून परतलेल्या प्रत्येकाची स्वॅब तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी नवी दिल्ली येथील जमातमध्ये भाग घेऊन गावी परतलेल्यांची यादी काढली होती. या यादीनुसार संबंधितांना पोलीस अधिकाऱयांमार्फत सूचना देण्यात येत असून दिल्लीहून परतलेल्या प्रत्येकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन स्वॅबचे नमूने देण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंबंधी सर्व तालुक्यातील पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या असून अधिकारी या दिशेने कामाला लागले आहेत. जंगलवाले मशिदीत धर्मसभेत भाग घेतलेल्या प्रत्येकांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांची यापूर्वी फ्लू कॉर्नरमध्ये आरोग्य तपासणी झाली आहे. त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. बेळगाव शहर व जिल्हय़ातील 100 हून अधिक जण दिल्लीच्या धर्मसभेत भाग घेतला होता. जिल्हा प्रशासनाला यापैकी 96 जणांचा तपशील उपलब्ध झाला आहे.
प्रशासनाचा बेबनाव उघड
मरकजहून परतलेल्या व कोरोना संशयित म्हणून ज्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नाही. असे दिसून येते. कारण लॉज व वेगवेगळय़ा धार्मिक स्थळांवर ज्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करणे किंवा त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. ही गोष्ट सामोरी आली आहे. जिल्हा पातळीवरील अधिकाऱयांनी वेळीच सावध होऊन समन्वयाने कामे केली नाहीत तर कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
सिव्हिल हॉस्पिटलसमोर बंदोबस्त वाढविला
कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. याबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या संशयितांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन व क्वारंटाईन विभागाबाहेर रविवारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहर सशस्त्र दलाचे एक वाहन रविवारी सकाळपासूनच या इमारतीसमोर होते. याबरोबरच वेगवेगळय़ा पोलीस स्थानकातील आठ पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
आता गल्लीच्या प्रवेशद्वारांवरही स्क्रिनिंग
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र व्यापक खबरदारी घेण्यात येत आहे. इस्पितळे, सरकारी कार्यालये, आदींबाहेर प्रत्येकाची स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आता हीच व्यवस्था गल्लीमधूनही सुरू झाली आहे. रविवारी गणाचारी गल्लीच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनरनी प्रत्येकाची स्क्रिनिंग करून त्यांना गल्लीत प्रवेश देण्यात येत होता. गल्लींच्या प्रवेशद्वारावर अडथळे उभे करून बाहेरहून येणाऱया नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे अडथळे उभारणे चुकीचे असल्याचे रविवारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळळ्ळी यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. अशा अडथळय़ांमुळे अत्यावश्यक सेवा पुरविण्यास अडचणी येतात. ते त्वरित हटविण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
लॉकडाऊन काटेकोरपणे करा
पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी रविवारी सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेतली. पॉझिटिव्ह प्रकरणांमुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिली असून ग्रामीण भागातील लोक सामाजिक अंतराचे नियम पाळत आहेत. शहरातही अंतर ठेवावा. असे रमेश जारकीहोळी यांनी बैठकीत सांगितले आहे. या बैठकीत पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. आदी अधिकारी उपस्थित होते.









