लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱयांना प्रशिक्षण : स्वतःच्या बँडद्वारे उत्पादने विक्री करणे शक्य
प्रतिनिधी / बेंगळूर
पिकविण्यात आलेली फळे बाजारात लवकर विक्री न केल्यास ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, अशा फळांवर प्रक्रिया करून पदार्थ बनविल्यास शेतकऱयांना लाभ होतो. त्याकरिता नवी पद्धत रायचूर कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. त्यामुळे शेतकऱयांना लाभ होणार आहे, असा दावा विद्यापीठाने केला आहे.
बागायती पिके विक्री करणे मोठे आव्हानात्मक असते. योग्य वेळी फळांची विक्री न झाल्यास ते खराब होतात. अशा फळांवर प्रक्रिया करून त्यांची विविध पदार्थांच्या स्वरुपात विक्री केल्यास शेतकऱयांना अधिक लाभ मिळतो. परंतु, शेतकऱयांना याविषयी अधिक माहिती नसल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱयांना केंद्रस्थानी मानून रायचूर कृषी विद्यापीठाच्या आहार तंत्रज्ञान विभागाकडून फळांवर प्रक्रिया करण्याची माहिती दिली जात आहे. तसेच पदार्थ तयार करून दिले जात आहेत. रायचूरमध्ये आंबा, पेरु, अंजीर या फळांचे जाम, बार (वडय़ा), पावडर करून त्यांची विक्री करण्याची पद्धत समजावून दिली जात आहे.
विद्यापीठाच्या या विभागात दरमहा 300 ते 550 किलोपर्यंत फळांवर प्रक्रिया करून त्यांची उत्पादने तयार केली जात आहेत. शेतकऱयांना याविषयी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. रायचूर, बळ्ळारी, कोप्पळ जिल्हय़ात सध्या अंजीर पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात आहे. अंजुरवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केली जात आहे. मशिनीच्या साहाय्याने फळांची साल बाजूला करून गर वेगळा केला जातो. त्यापासून जाम, बर्फी, पावडर असे अनेक पदार्थ तयार केले जात आहेत.
माफक शुल्क आकारणी
अंजीरपासून जाम तयार करण्यासाठी प्रतिकिलो 150 रुपये, बर्फीसाठी 250 रुपये आणि पावडर तयार करण्यासाठी 500 रुपये दर आकारला जात आहे. ह पदार्थ शेतकरी स्वतःच्या ब्रँडद्वारे 250 रु., 400 रु. आणि 1000 रु. दराने विक्री करू शकतात.