चंदिगढ ः
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला देण्यात आलेल्या 21 दिवसांच्या पॅरोलवर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंबंधीच्या आव्हान याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला नोटीस बजावून 21 फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला या प्रकरणाशी संबंधित रेकॉर्ड पुढील सुनावणीवेळी सादर करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती बी. एस. वालिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सध्या तो गुरुग्राममधील नामचर्च येथे कडेकोट बंदोबस्तात आहेत.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची 7 फेबुवारीला पॅरोलवरील सुट्टीमुळे तुरुंगातून सुटका झाली होती. त्याला हरियाणातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले होते. पंजाबमधील निवडणुकीच्या 13 दिवस आधी राम रहीमची सुटका झाल्यामुळे याचा लाभ निवडणुकीत होण्याचा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा आहे. गुरमीत राम रहीमची सुटका ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमधील अनेक विधानसभा जागांवर डेरा सिरसाचा प्रभाव आहे. डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्हय़ात आहे. पंजाबमधील माझा, माळवा आणि दोआबा भागातही या डेरांचे वर्चस्व आहे.
राम रहीमला ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड आणि रणजीत हत्या प्रकरणातही त्याला दोषी ठरवण्यात आले. तुरुंगाच्या नियमांनुसार, कोणताही कैदी पॅरोल किंवा सुट्टी घेऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य हरकती पाहून शासन आणि जिल्हा प्रशासनाला या संबंधित निर्णय घ्यावा लागतो. अलीकडेच राम रहीमने तुरुंग प्रशासनाकडे 21 दिवसांची रजा मागितली होती. कारागृह प्रशासनाने शासनाकडे अर्ज पाठवला होता. यानंतर राम रहीमला सुट्टी मंजूर झाली होती. पंजाबमधील 23 जिल्हय़ांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, जे राज्याच्या राजकारणात थेट सामील आहेत.









