वृत्तसंस्था / रोहतक
संचित रजेवर (फरलो) तुरुंगातून बाहेर असलेला डेरामुखी गुरमीत राम रहिमला आता झेड प्लस सुरक्षेत ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी हरियाणा सीआयडीकडून रोहतकच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले होते. राम रहिमला खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे इनपूट गृह मंत्रालयाकडून मिळाले आहेत. हाच धोका पाहता त्याची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
डेरामुखी गुरमीत राम रहिम 7 फेब्रुवारीपासून फरलोवर असून यादरम्यान तो गुरुग्राम येथील स्वतःच्या डेऱयात कुटुंबासोबत राहत आहे. गुरमीतला फरलो देण्याच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात 23 फेबुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
राम रहिमला फरलो देण्यात आल्याप्रकरणी देखील मोठा खुलासा झाला आहे. राम रहिमेने रोहतकच्या सुनारिया तुरुंग अधिकाऱयाला 31 जानेवारी रोजी पत्र लिहून 3 आठवडय़ांचा फरलो देण्याची मागणी केली होती. तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत गुरुग्राममध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आपण 4 वर्षे 4 महिन्यांपासून तुरुंगात कैद असून कुटुंबाला भेटण्यासाठी 10 दिवसांची संचित रजा इच्छितो असे त्याने म्हटले होते. राम रहिमच्या या मागणीवर रोहतक पोलीस आयुक्तांकडून गुरुग्राम जिल्हाधिकाऱयांकडून सुरक्षा तसेच अन्य कारणांवर भूमिका मांडण्यास सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱयांनी एका दिवसात म्हणजेच 1 जानेवारीला राम रहिमला फरलो देण्याची शिफारस करणारे पत्र पाठविले होते.